Cargo Service : कोल्हापूर विमानतळावरून कार्गो सेवा सुरू होणार | पुढारी

Cargo Service : कोल्हापूर विमानतळावरून कार्गो सेवा सुरू होणार

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
कोल्हापूर विमानतळावरून आता कार्गो Cargo Service (मालवाहतूक) सेवाही सुरू होणार आहे. भारतीय नागरी विमान सुरक्षा ब्युरोने (बीसीएएस) सोमवारी कार्गो सेवेसाठी कोल्हापूर विमानतळाला परवानगी दिली. यामुळे विमानतळावरून लवकरच मालवाहतुकीलाही प्रारंभ होणार आहे. प्रवासी वाहतूक करणार्‍या विमानातूनच पाचशे किलोपर्यंत मालवाहतूक करता येणार आहे. यामुळे कोल्हापूरच्या विकासाला चालना मिळणार आहे.

Cargo Service कार्गो सेवेसाठी परवानगी

केंद्र शासनाच्या उडान योजनेंतर्गत दि. 9 डिसेंबर 2018 पासून कोल्हापूर विमानतळावरून प्रवासी वाहतूक सुरू झाली. मुंबई, बंगळूर, हैदराबाद व अहमदाबाद या राजधानीच्या शहरांशी उडान योजनेंतर्गत हवाई मार्गाने जोडलेले कोल्हापूर पहिले शहर ठरले आहे. प्रवाशांचाही विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यात आता कार्गो सेवेची भर पडली आहे. कोल्हापुरातून सध्या सुरू असलेल्या फ्लाईटस्मधूनच (प्रवासी विमानातून) मालवाहतूकही केली जाणार आहे.याकरिता ‘बीसीएएस’च्या पथकाने दि. 17 व दि. 18 नोव्हेंबर रोजी दोन दिवस विमानतळाची पाहणी केली होती. आवश्यक सर्व बाबींची पूर्तता झाल्यानंतर सोमवारी कार्गो सेवेसाठी परवानगी देण्यात आली आहे.

कार्गो हब उभारणार

जिल्ह्यात कृषी, औद्योगिक उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. यामुळे मालवाहतुकीची आवश्यकता आहे. याद‍ृष्टीने भविष्यात कोल्हापूर विमानतळावर कार्गो हब उभारण्याचे नियोजन आहे. तशी घोषणा तत्कालीन नागरी विमान वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांनी कोल्हापुरातच विमानतळ टर्मिनस इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात केली होती. त्याचा पहिला टप्पा आता पूर्ण झाला. भविष्यात कोल्हापूर विमानतळावर कार्गो हब उभारण्याचे नियोजन आहे. सध्याच्या विमानतळ इमारतीचा वर्षभरानंतर वापर केला जाऊ शकतो. भाजीपाल्यासह नाशिवंत पदार्थांसाठी कोल्ड स्टोअरेज आणि सोन्या-चांदीच्या दागिन्यांसारख्या मौल्यवान वस्तूंसाठी सुरक्षिततेच्या द‍ृष्टीने विशिष्ट रचना असलेली व्यवस्था या इमारतीत करता येणे शक्य असल्याचे कोल्हापूर विमानतळाचे संचालक कमल कटारिया यांनी सांगितले.

औषधे, वैद्यकीय उपकरणे,भाजी, फळे, फुलांची वाहतूक

पहिल्या टप्प्यात औषधे, वैद्यकीय उपकरणे, भाजीपाला, फळे, फुले आदींची वाहतूक केली जाणार आहे. त्यासाठी हे सर्व साहित्य विमान सुटण्याच्या वेळेपूर्वी चार तास अगोदर स्वीकारले जाणार आहे.

वैद्यकीय उपकरणांची झाली होती पहिली वाहतूक
यापूर्वी कोल्हापूर विमानतळावर पहिली मालवाहतूक कोरोना कालावधीत झाली. जिल्हा प्रशासनाने कोलकातावरून ऑक्सिमीटर मागवले होते. ते कोलकात्यावरून हैदराबादला आणि तेथून कोल्हापुरात आणण्यात आले होते.

Back to top button