सांगली; पुढारी वृत्तसेवा : राजेवाडी तलावात जीये कटापूर किंवा उरमोडी प्रकल्पाचे पाणी सोडावे, राजेवाडी परिसरातील कोणत्याही योजनेत समावेश नसलेल्या गावांना पाणी द्यावे, अशी मागणी खासदार संजयकाका पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. याबाबतची माहीती आमदार पडळकर आणि अमरसिंह देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी पडळकर व देशमुख म्हणाले की, राजेवाडी, लिंगिवरे, उंबरगांव, पुजारवाडी (दिघंची) आणि दिघंची गावातील काही भागाचा कोणत्याही पाणी योजनेत समावेश नाही. पाऊस पडला तरच या भागाला पाणी मिळते. अतिदुष्काळी भागातील राजेवाडी तलाव दहा वर्षातून एकदा पावसाच्या पाण्याने भरतो. १०० वर्षांपेक्षा जास्त जुन्या तलावाच्या वरील बाजूस छोटी छोटी धरणे असल्याने तो दरवर्षी भरत नाही. तलावात नैसर्गिक आवक कमी आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकरी पाण्यापासून वंचित राहतात. हा तलाव जीये कटापूर आणि उरमोडी यांच्या लाभ क्षेत्रात येतो. या योजनेचे सुमारे ०.७५ टीएमसी पाणी या तलावात दिले तर दरवर्षी पावसाळयात हा तलाव भरणार आहे.
आटपाडी तालुक्यातील पाण्यापासून वंचित शेतकऱ्यांना या पाण्याचा लाभ होणार आहे. त्यामुळे राजेवाडी तलावामध्ये जीये कटापूर किंवा उरमोडी प्रकल्पाचे पाणी सोडणेबद्दल संबंधिताना योग्य ते आदेश द्यावेत, अशी मागणी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत लवकरच बैठक घेऊन प्रत्यक्ष पाणी देण्याची अंमलबजावणी करण्याची ग्वाही दिल्याने या परिसराचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघणार असल्याचेही ते म्हणाले.
कोरेगांव आणि माण तालुक्यातील पाण्याची गरज पूर्ण होऊन जिये कटापूर आणि उरमोडी धरणातील शिल्लक पाण्यातील ०.७५ टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्यास उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे दुष्काळी भागातील ऐतिहासिक राजेवाडी तलाव आणि माणगंगा नदी बारमाही होण्याच्या कामाला गती मिळेल, अशी अपेक्षा गोपीचंद पडळकर आणि अमरसिंह देशमुख यांनी व्यक्त केली.
राजेवाडी तलावात जीये कटापुर किंवा उरमोडी धरणातून पाणी सोडण्यासाठी केवळ पाणी सोडणाऱ्या विद्युत मोटार फक्त जास्त वेळ चालू ठेवायला लागणार आहेत. त्यामुळे माफक खर्चात पाच गावांचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. यावेळी हर्षवर्धन देशमुख, अनिल पाटील, मोहन रणदिवे, प्रणव गुरव आदी उपस्थित होते.
हेही वाचा :