चोवीस तासांत रस्त्याची डागडुजी, नागरिकांच्या तक्रारीची ‘परिवर्तन’ हेल्पलाईनकडून दखल | पुढारी

चोवीस तासांत रस्त्याची डागडुजी, नागरिकांच्या तक्रारीची ‘परिवर्तन’ हेल्पलाईनकडून दखल

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : मोशीमधील ‘बीआरटीएस’ रस्त्यालगत गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी रस्त्याचे खोदकाम करण्यात आले होते. पाईपलाईन टाकल्यानंतर डांबरीकरण न केल्याने वाहनचालक व नागरिक त्रस्त झाले होते. त्यांच्याकडून परिवर्तन हेल्पलाईनला तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर महापालिका प्रशासनाशी याबाबत संपर्क साधून येथील रस्त्याच्या डागडुजीचे काम 24 तासांत पूर्ण करण्यात आले. आ. महेश लांडगे यांच्या पुढाकाराने भोसरी विधानसभा मतदार संघासह परिसरातील नागरिकांच्या प्रशासकीय आणि सार्वजनिक समस्या सोडवण्यासाठी ‘परिवर्तन हेल्पलाईन’ सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्या माध्यमातून पायाभूत सोयी-सुविधांसाठी नागरिक आणि महापालिका प्रशासनातील दुवा बनून नागरिकांचे प्रश्न मार्गी लावले जात आहे.

महापालिका प्रशासनाने देहू- आळंदी बीआरटी रस्ताहा देहू व आळंदी या दोन तीर्थक्षेत्रांना जोडण्यासाठी रस्ता विकसित केला आहे. याचा काही भाग मोशी गावाच्या हद्दीतून जातो. मोशीमधील बीआरटी रोडवरील भारत माता चौक ते आळंदीपर्यंत असलेल्या 5 किलोमीटर लांबीच्या रस्त्याकडेने गॅसवाहिनी टाकण्यासाठी रस्ता खोदला होता. गॅस वाहिनी टाकण्याचे काम दोन महिन्यांपूर्वी पूर्ण झाले; मात्र रस्त्याची डागडुजी करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांना व वाहनचालकांना त्याचा त्रास होत होता; तसेच दुचाकीस्वारांना अपघातास सामोरे जावे लागत होते. याबाबत नागरिकांच्या विविध तक्रारी आल्या होत्या, अशी माहिती ‘परिवर्तन हेल्पलाईन’चे मुख्य समन्वयक ऋषभ खरात यांनी दिली.

येथील रहिवासी राजेश सस्ते म्हणाले की, गॅस वाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर येथील रस्त्यावर संपूर्ण दगडखडी वर आली होती. खड्डे पडले होते. या खडीवरून घसरुन दुचाकी चालकांना अपघात होण्याचा धोका होता. मॉर्निंग वॉकसाठी येणार्या नागरिकांच्या याबाबत तक्रारी होत्या. त्यामुळे खोदलेल्या रस्त्यावर पुन्हा डांबरीकरण करण्याची मागणी केली होती. त्यावर परिवर्तन हेल्पलाईनच्या माध्यमातून पाठपुरावा करुन महापालिका प्रशासनाकडून या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले.

Back to top button