Share Market Updates | गुंतवणूकदारांना धक्का! अमेरिकेतील महागाईमुळे शेअर बाजार धास्तावला, सेन्सेक्स ४१९ अंकांनी घसरला | पुढारी

Share Market Updates | गुंतवणूकदारांना धक्का! अमेरिकेतील महागाईमुळे शेअर बाजार धास्तावला, सेन्सेक्स ४१९ अंकांनी घसरला

पुढारी ऑनलाईन डेस्क : कमकुवत जागतिक संकेतांमुळे आज गुरुवारी (दि.१०) शेअर बाजारात (Share Market Updates) घसरण झाली. बाजार खुला होताच सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ३२६ अंकांनी घसरून ६०,७०० वर होता. तर निफ्टी १०९ अंकांनी खाली येऊन १८ हजारांवर आला. त्यानंतर दोन्ही निर्देशांकाची घसरण वाढत गेली. सेन्सेक्स ४१९ अंकांनी घसरून ६०,६१३ वर बंद झाला. तर निफ्टी १२८ अंकांनी खाली येऊन १८,०२८ वर बंद झाला. जागतिक बाजारातील नकारात्मक संकेत आणि अमेरिकेतील वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर भारतासह आशियाई बाजारात घसरण दिसून आली. दरम्यान, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ३३ पैशांनी घसरून ८१.८० वर बंद झाला.

हे शेअर्स ठरले टॉप लुजर्स

सेन्सेक्सवर ॲक्सिस बँक, टेक महिंद्रा, एम अँड एम, अल्ट्राटेक सिमेंट, मारुती आणि टाटा स्टील टॉप लुजर्स ठरले. या कंपन्यांचे शेअर्स १ ते २.५ टक्क्यांपर्यं घसरले. एचडीएफसी, रिलायन्स, एचडीएफसी बँक, एशियन पेंट्स आणि आयसीआयसीआय बँकच्या शेअर्समध्येही घसरण दिसून आली. तर भारती एअरटेल, डॉ. रेड्डीज लॅब्स, एचयूएल, पॉवर ग्रिड कॉर्प, एचसीएल टेक आणि नेस्लेचे शेअर्स वधारले.

झोमॅटोचे शेअर्स २.८३ टक्क्यांनी घसरून ६३.४५ रुपयांवर आला. तर टाटा मोटर्सचा शेअर ४.५६ टक्क्यांनी घसरून ४१३.२५ रुपयांवर पोहोचला. युनियन बँक ऑफ इंडियाचा शेअर ४.७६ टक्क्यांनी वाढून ६७.१५ रुपयांवर गेला. लुपिनचा शेअर ५.४१ टक्क्यांनी वाढून ७३१.६० रुपयांवर पोहोचला. रॅमको सिमेंट्सचे शेअर ८.४४ टक्क्यांनी घसरला. एकूणच बीएसईवर १,३५२ शेअर्स वाढताना दिसले तर १,६२५ शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

आशियाई शेअर्स घसरले

न्ययॉर्क स्टॉक एक्स्चेंजवर घसरण झाल्यानंतर गुरुवारी टोकियोचे स्टॉकही घसरले. बेंचमार्क निक्केई २२५ निर्देशांक ०.९८ टक्के म्हणजे २७०.३३ अंकांनी घसरून २७,४४६ वर बंद झाला, तर टॉपिक्स निर्देशांक ०.६६ टक्के म्हणजेच १२.८३ अंकांनी घसरून १,९३६ वर बंद झाला.

नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या आकडेवारीनुसार, विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी बुधवारी ३८७ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली. तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी १,०६० कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली. बुधवारी BSE सेन्सेक्स १५२ अंकांनी म्हणजेच ०.२५ टक्क्यांनी घसरून ६१,०३४ वर बंद झाला होता. तर NSE निफ्टी ४६ अंकांनी खाली येऊन १८,१५७ वर बंद झाला होता. (Share Market Updates)

हे ही वाचा :

Back to top button