विटा : थकीत बिलापोटी अखेर नागेवाडी कारखान्याच्या साखरेचा लिलाव

विटा : थकीत बिलापोटी अखेर नागेवाडी कारखान्याच्या साखरेचा लिलाव
Published on
Updated on

विटा, पुढारी वृत्तसेवा : अखेरीस शेतकऱ्यांच्या १६ कोटी रुपयांच्या थकीत ऊस बिलासाठी नागेवाडीच्या यशवंत साखर कारखान्याच्या (Yashwant Sugar) ५० हजार क्विंटल साखरेचा लिलाव काढण्याची नामुष्की कारखाना प्रशासनावर आली. तहसीलदार ऋषीकेत शेळके यांनी ही लिलाव प्रक्रिया पूर्ण केली.

नागेवाडीच्या यशवंत शुगर कारखान्याला ऊस घालणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या उसाची थकित बिले अद्याप मिळालेली नव्हती. याबाबत भक्त राज ठिगळे प्रणित शेतकरी सेना आणि माजी खासदार राजू शेट्टी प्रणित स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी आंदोलने केली होती. शिवाय राज्य साखर आयुक्तांकडे लेखी तक्रारही केली होती. त्यानुसार‌ साखर आयुक्तांनी खासदार संजय पाटील यांच्या तासगाव आणि नागेवाडीच्या यशवंत शुगर या दोन्ही कारखान्यांच्या साखर आणि मालमत्ता विक्रीचे आदेश दिले होते.

त्यानुसार यशवंत शुगर कारखान्याच्या (Yashwant Sugar)  ५० हजार क्विंटल साखरेचा लिलाव प्रक्रिया आज शुक्रवारी तहसिलदार कार्यालयामध्ये पूर्ण करण्यात आली. या लिलाव प्रक्रियेमध्ये पाच व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला. यात कराडच्या एस जी ट्रेडर्स च्या व्यापाऱ्याने ३ हजार १०० रूपये शासकीय किमतीनुसार निविदा भरली. सर्वाधिक बोली आल्याने एस जी ट्रेडर्स च्या व्यापाऱ्यास ही साखर मिळणार आहे. त्यामुळे साधारणत: यशवंत च्या थकीत बिला पोटी हे १६ कोटी रूपये मिळणार आहेत, असे तहसिलदार ऋषीकेत शेळके यांनी जाहीर केले. दरम्यान, सोमवारी या लिलावापोटी २५ टक्के रक्कम संबंधित व्यापाऱ्यास भरण्यास सांगण्यात आली आहे. ही प्रक्रिया झाल्यानंतर साधारणत: १५ ते २० दिवसामध्ये नागेवाडी साखर कारखान्याची सर्व थकित बिल शेतकऱ्यांना दिली जातील, असेही तहसीलदार शेळके यांनी सांगितले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे म्हणाले, आम्ही संघटनेच्या माध्यमातून गेल्या वर्षभरामध्ये तासगाव आणि नागेवाडी या दोन्ही कारखान्याच्या थकीत ऊस बिलासाठी संघर्ष केला होता. सुरुवातीला शेतक ऱ्यांना ३४ कोटीची बिले मिळाली होती. उर्वरीत बिलासाठी चाललेल्या संघर्षाला आज अखेर यश आले. निश्चितपणाने येत्या तीन आठवड्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यावर ऊस बिले वर्ग करेपर्यंत आम्ही पाठपुरावा करू, असेही खराडे म्हणाले.

या लिलाव प्रक्रियेवेळी महेश खराडे, राजू माने, अख्तर संदे, तानाजी धनवडे, अमित रावताळे, सरदार सावंत , महेश जगताप, भुजंग पाटील, बंडू पाटील, अजित चव्हाण, यांच्यासह विटा, वासुबे, नागेवाडी, वलखड, चिखलहोळ भाग्यनगर, दिघंची, विसापूर, बोरगाव, आळते कवठेएकंद, शिवणीसह अन्य गावातील शेतकरी उपस्थित होते.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ 

युद्ध युक्रेनमध्ये पण फोडणी महागली भारतात

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news