दिशा मृत्यू प्रकरण : न्यायालयाकडून राणे पिता-पुत्राला अटकेपासून दिलासा | पुढारी

दिशा मृत्यू प्रकरण : न्यायालयाकडून राणे पिता-पुत्राला अटकेपासून दिलासा

मुंबई, पुढारी ऑनलाईन : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पूत्र आमदार नितेश राणे यांनी वादग्रस्त विधाने केल्यामुळे दिशाच्या आईने म्हणजेच वासंत सतीश सालियन यांनी तक्रार केली होती. त्यासंदर्भात दिंडोशी न्यायालयाने पिता-पुत्राला अटकेपासून संरक्षण दिलेले आहे. १० मार्चपर्यंत दोघांना अटक करता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटलेले आहे. (दिशा मृत्यू प्रकरण)

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात नारायण राणे आणि नितेश राणे यांनी आक्षेपार्ह विधाने केलेली होती. त्यामुळे दिशाच्या आईने मालवणी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध तक्रार दाखल केलेली होती. त्यावर दिंडोशी न्यायालयात सुनावणी होती, त्यावर न्यायालयाने दोघांना अटकेपासून संरक्षण दिलेले आहे. राणेंच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या आरोपांचा तपास पोलीस निरीक्षक महेंद्र सुर्यवंशी तपास करीत आहेत.

काही दिवसांपूर्वीच नारायण राणे आणि नितेश राणे यांचा जबाब नोंदविण्यासाठी दोघांना नोटीस बजवण्यात आली होती. या नोटिसीविरोधात राणेंना दिंडोशी न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी याचिका करण्यात आली होती. त्याची सुनावणी करताना १० मार्चपर्यंत दोघांना अटक करता येणार नाही, असा निर्णय देण्यात आला आहे. (दिशा मृत्यू प्रकरण)

१९ फेब्रुवारीला नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्यांनी दिशाच्या बाबतीत आक्षेपार्ह विधाने केलेली होती. तसेच नितेश राणे यांनीही वादग्रस्त वक्तव्य केलेली होती. दिशाच्या मृत्यू प्रकरणात शिवसेना नेत्यांवर नारायण राणेंनी टीका केली होती. या प्रकरणात शिवसेनेचा मोठा नेता तुरुंगात जाणार, असल्याचेही त्यांनी सांगितले होते. दिशाला न्याय मिळवून देतोय, यासाठी तिच्या कुटुंबियांनी आमचे आभार मानायला हवेत, असंही राणे म्हणाले होते. या प्रकरणात दोघांची शनिवारी (५ मार्च) मालवणी पोलीस ठाण्यात चौकशी होणार आहे.

Back to top button