

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेत (icc womens world cup) वेस्ट इंडिजने विजयी सुरुवात केली आहे. त्यांनी स्पर्धेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडवर 3 धावांनी रोमहर्षक विजय नोंदवला. शेवटच्या षटकातील भेदक मा-याच्या जोरावर विंडिजने संघाच्या विजयावर मोहोर उमटवली. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने 50 षटकांत 9 गडी गमावून 259 धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडला 49.5 षटकांत 256 धावाच करता आल्या.
वास्तविक, सामन्याच्या शेवटच्या षटकात न्यूझीलंडला विजयासाठी 6 धावांची गरज होती. पण, 3 विकेट्स शिल्लक असतानाही किवी संघाला 6 धावा करता आल्या नाहीत आणि तीनही विकेट गमावल्या. अशा प्रकारे, वेस्ट इंडिजने 12 व्या विश्वचषक स्पर्धेतील पहिला जिंकला. वेस्ट इंडिजच्या हेली मॅथ्यूजला तिच्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. (icc womens world cup)
तत्पूर्वी, न्यूझीलंडने नाणेफेक जिंकल्यानंतर वेस्ट इंडिजला प्रथम फलंदाजीची संधी दिली. कॅरेबियन संघाची सुरुवात खराब झाली आणि 40 धावांतच संघाने आपल्या दोन विकेट गमावल्या. डायंड्रा डॉटिन 12 आणि किसिया नाईट 5 धावांवर स्वस्तात बाद झाल्या. यानंतर हेली मॅथ्यूज आणि स्टेफनी टेलर यांनी संघाचा डाव सावरला. दोघींमध्ये तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी झाली. पण, लया तौहू हिने ही जोडी फोडली. तिने टेलरला (३०) धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. मॅथ्यूजने एका टोकाकडून शानदार फलंदाजी सुरू ठेवली आणि आपले शतक पूर्ण केले. तिने 128 चेंडूत 16 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 119 धावा केल्या. चिडियन नेशननेही 36 धावांचे योगदान दिले. अशा प्रकारे वेस्ट इंडिजने 50 षटकांत 9 बाद 259 धावांपर्यंत मजल मारली. न्यूझीलंडकडून ली तैहूने 3 बळी घेतले. (icc womens world cup)
260 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना किवी संघाची सुरुवात खराब झाली. उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेली सुझी बेट्स 3 धावांवर धावबाद झाली. अमेलिया केरही केवळ 13 धावांचे योगदान देऊ शकली. यष्टिरक्षक सोफी डेव्हाईन आणि एमी सॅटरथवेट (31) यांनी 76 धावांची भागिदारी केली. मात्र, ए. मोहम्मद हिने ही भागिदारी मोडत न्यूझीलंडला तिसरा झटका दिला. यावेळी संघाची धावसंख्या 123 होती. यानंतर काही अंतराने विकेट पडत गेल्या. पण कर्णधार सोफी डिव्हाईनने एका बाजूने शानदार फलंदाजी केली. तिने झुंझार शतकी (127 चेंडूत 108) खेळी साकारली. ती बाद झाल्यानंतर वेस्ट इंडिजने सामन्यात पुनरागमन केले. पण, केट मार्टिन आणि जेस केर यांनी आठव्या विकेटसाठी 40 धावांची भागीदारी करत सामन्याचा निकाल अंतिम षटकापर्यंत नेला. शेवटच्या षटकात न्यूझीलंडला विजयासाठी 6 धावांची गरज होती, परंतु डॉटिनने अप्रतिम गोलंदाजी करत मार्टिन (44) आणि त्यानंतर केर (25) या दोन्ही फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आणि रोमहर्षक सामन्यात कोवी संघावर अवघ्या 3 धावांनी विजय मिळवला. वेस्ट इंडिजच्या हेली मॅथ्यूज, अनिसा मोहम्मद, डिआंड्रा डॉटिन यांनी प्रत्येकी दोन, तर चिनेल हेन्री आणि शकेरा सेलमन यांनी एक बळी घेतला.