सांगली : कडेगावात शॉर्ट सर्किटमुळे १५ एकरातील ऊस जळून खाक

सांगली : कडेगावात शॉर्ट सर्किटमुळे १५ एकरातील ऊस जळून खाक
Published on
Updated on

कडेगाव; पुढारी वृत्तसेवा: कडेगाव येथील बारा पट्टा परिसरात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत सुमारे १५ एकरातील ऊस जळून खाक झाला आहे. महावितरणच्या गलथान आणि भोंगळ कारभारामुळे अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काही दिवसातच कारखान्यास सदर ऊस गाळपासाठी जाणार असताना ही घटना शनिवारी (दि.५) रोजी दुपारी १ वाजता घडली. दरम्यान येथील स्थानिक शेतकऱ्यांनी आग विझविण्याचे अतोनात प्रयत्न केल्याने पुढील २५ एकरातील ऊस आगीपासून वाचवण्यात यश आले आहे.

येथील अल्पभूधारक शेतकरी नितीन शिंदे, प्रकाश शिंदे, भीमराव जाधव, तानाजी भोसले, मोहन जाधव यांचा सुमारे १५ एकरातील उसाचे क्षेत्र जळून खाक झाले. दरम्यान यावेळी आग विझवण्यासाठी येथील शेतकरी वसंत सुर्वे, सागर नलवडे, रोहित चन्ने, शंकर नायकवडी, अभिजित पाटील, मनोज सुर्यवंशी, जीवन शेटे, सादिक पिरजादे, राजू बागवान, सचिन शिंदे, लाला शिंदे, अल्ताफ शेख, कौशल धर्मे , इंद्रजित थोरात, आकाश धर्मे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी प्रयत्न केला. त्यामुळे पुढील अनर्थ टाळला आहे. या घटनेत शेतकऱ्यांचे मात्र खूपच नुकसान झाले आहे.

यापूर्वी शेतकऱ्यांनी संभाव्य धोका ओळखून विजेच्या लोंबकळत असलेल्या विद्युत तारांचा बंदोवस्त करावा, सदर डीपी दुरुस्तीची विनंती केली होती. परंतु, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. महावितरणने शेतकऱ्यांच्या विनंतीची दखल घेवून त्या अनुषंगाने शेतातील लोंबणा-या ताराची व डीपीची दुरुस्ती केली असती तर ऊस आग लागली नसती अशी प्रतिक्रिया नागरिक देत आहेत. ( १५ एकरातील ऊस जळून खाक )

कडेगाव शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागांत अनेक ठिकाणी महावितरणच्या वाकडे पोल, लोंबत्या तारा, उघडे डीपी हे चित्र पहायला मिळत आहे. महावितरणचे अधिकारी या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन अनेक ठिकाणी आगी लागल्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबतची दखल न घेणा-या महावितरण अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. तर सध्या जळून खाक झालेल्या शेतकऱ्याचे ऊस पिकाचे नुकसान भरपाई महावितरणने द्यावी अशी मागणी होत आहे.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news