देवगांव रंगारी, (जि. औरंगाबाद ) पुढारी वृत्तसेवा : कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी येथे अंगणात उभ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून पळुन जाणाऱ्या चोरट्यांना देवगाव रंगारी पोलीसांनी पाठलाग करत अवघ्या तासाभरात पकडले.याबाबत देवगाव रंगारी पोलीसांनी दाखविलेल्या तत्परतेबद्दल कौतुक केले जात आहे.हि घटना शनिवारी सकाळी साडेअकरा वाजे दरम्यान घडली.
याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असे की,देवगांव रंगारी – ताडपिंपळगांव रस्त्यावर सुशीला कृष्णा गोरे (वय ३०) या शनिवारी सकाळी आपल्या अंगणात उभ्या होत्या.त्याच वेळी दुचाकीवरून दोघे आले . त्यापैकी एक जण गाडीवरून उतरुन खाली महिलाजवळ गेला व त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून गाडीवरून पोबारा केला.सदर महिलेने तात्काळ पोलीस ठाणे गाठले व पोलीसांना त्या दुचाकीचा रंग व नंबर सांगितला.
यावेळी पोलीसांनी विलंब न करता सहाय्यक पोलीस निरीक्षक तात्या रुपाजी भालेराव यांनी सुत्रे हलवत पोलीस उपनिरीक्षक देविदास खांडखुळे, सहाय्यक फौजदार आप्पासाहेब काळे,वाहन चालक जमील तडवी, राहुल ठोंबरे, मधुकर राहणे, शेख जावेद,राजु सोनवणे,सीमा जाधव , गृहरक्षक दलाचे विक्रम सोनवणे यांनी शासकीय वाहनाने वैजापूर रस्त्याने जात असताना सदरील दुचाकी गारज येथील एका गॅरेज वर आढळुन आली.
पोलीसांनी एका जणास जागेवर ताब्यात घेतले तर एक जण पळुन जात असताना ग्रामस्थांच्या मदतीने पाठलाग करत एका शेतातील मका पिकात लपून बसलेल्या दूसऱ्या चोरट्यांस ही ताब्यात घेतले.त्यांच्याकडे सदरील महिलेची पोत आढळून आली.याबाबत राहुलकुमार चतुरीदास (वय २७) राहणार पचगच्छिया बाजार अभिया जिल्हा भागलपूर हल्ली मुक्काम चिकलठाणा, मुकुंदवाडी औरंगाबाद व रविंद्रकुमार सदानंद यादव राहणार ग्रामलतरा तालुका गोपालपुर जिल्हा भागलपूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तात्या रुपाजी भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक देविदास खांडखुळे सहाय्यक फौजदार आप्पासाहेब काळे करत आहे.
हे ही वाचलं का