अनुदानित खासगी प्राथमिक शाळांना मंजूर असलेल्या पटापेक्षा जास्त मुलांना प्रवेश देण्यात येऊ नये, असा ठराव शिक्षण समितीच्या सभेत सदस्यांनी मांडला. त्यानंतर निकषापेक्षा जास्त पटास शिक्षणाधिकारी यांची मंजूरी घ्यावी लागेल, असा ठराव शिक्षण विभागाच्या सभेत करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती आशा पाटील होत्या.
शिक्षण समितीचे सदस्य सुरेखा जाधव, सुरेंद्र वाळवेकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संजयकुमार राठोड, माध्यमिकचे विष्णू कांबळे तसेच शिक्षक प्रतिनिधी विनायक शिंदे उपस्थित होते. नवोदय विद्यालय प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यत 4 हजार 127 विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन झाले आहे. गतवर्षी 12 हजार 556 विद्यार्थी परीक्षेमध्ये प्रवेश घेतला होता.
अर्ज भरण्याची अंतिम मुदत (दि. 30)पर्यत आहे. त्यामुळे तालुकानिहाय किमान 20 टक्के प्रवेश वाढवावेत, यासाठी प्रयत्न करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यास प्रवृत्त करा. कोणताही विद्यार्थी लाभापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्या, अशा सुचना सभेत देण्यात आल्या.
सारथी संस्थेमार्फत देण्यात येणार्या शिष्यवृत्तीसाठी मराठा, कुणबी व कुणबी मराठा या वर्गातील एनएमएमएस विद्यार्थ्यांचे मागणी अर्ज तालुका स्तरावर माध्यमिक शिक्षण विभागाकडे तातडीने पाठवावेत. सदर प्रस्ताव गटशिक्षणाधिकारी यांनी तात्काळ पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत
हे प्रस्ताव सारथी संस्थेकडे पाठविण्यात येणार आहे. यावेळी कराड येथील परिवर्तन प्रतिष्ठान यांच्या मार्फत सदस्या अॅड. शांता कनुंजे यांना राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याबद्दल सभेत त्यांचा सत्कार करण्यात आला.