INS Vela : नौदलाला आज चौथी स्कॉर्पीन श्रेणीची पाणबुडी मिळणार | पुढारी

INS Vela : नौदलाला आज चौथी स्कॉर्पीन श्रेणीची पाणबुडी मिळणार

पुढारी ऑनलाईन डेस्क

INS Vela : भारतीय नौदल सातत्याने आपली ताकद वाढवत आहे. नौदलात INS विशाखापट्टणमच्या समावेशामुळे समुद्रातील भारताची ताकद वाढली आहे. आता भारतीय नौदलाची ताकद आणखी वाढणार आहे. आज आयएनएस वेला भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील होणार आहे. मुंबईतील माझगाव डॉकयार्ड येथे नेव्हल ग्रुप, फ्रान्सच्या सहकार्याने ही पाणबुडी तयार करण्यात आली आहे. ही पाणबुडी ९ नोव्हेंबर रोजी भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली. याआधी आयएनएस कलवरी, खांदेरी, करंज याही भारतीय नौदलात सामील झाल्या आहेत. हे सर्व फ्रेंच स्कॉर्पियन क्लास पाणबुडी तंत्रज्ञानाच्या आधारे विकसित करण्यात आली आहेत.

आयएनएस वेलाचे कमांडिंग ऑफिसर कॅप्टन अनीस मॅथ्यू म्हणाले की, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. या पाणबुडीमध्ये स्वदेशी बॅटरी आणि प्रगत दळणवळणाचा संच आहे, ज्यामुळे स्वावलंबी भारताच्या कल्पनेला प्रोत्साहन मिळते. आयएनएस वेलाची लांबी 75 मीटर आणि वजन 1615 टन आहे. या पाणबुडीवर एका वेळी 35 खलाशी आणि 8 अधिकारी तैनात केले जाऊ शकतात. पाणबुडी वेला समुद्राखाली 37 किमी वेगाने धावू शकते. तळ सोडल्यानंतर, आयएनएस वेला 2 महिने समुद्रात राहू शकते.

नौदलाच्या गरजा लक्षात घेऊन या पाणबुडीमध्ये युद्धसामुग्री बसवण्यात आली आहे. समुद्राखाली, शत्रूच्या पाणबुड्या आणि जहाजे नष्ट करू शकतात. भारतीय नौदलात आयएनएस वेला सामील झाल्यानंतर पाणबुड्यांची एकूण संख्या १७ होईल. त्याचबरोबर नौदल आपली ताकद वाढवण्यासाठी येत्या काही वर्षात आपल्या ताफ्यात आणखी पाणबुड्यांचा समावेश करणार आहे.

हेही वाचलत का?

Back to top button