पालकमंत्र्यांनी प्रॉपर्टीची माहिती लपवली; सरकारचा महसूल बुडविला | पुढारी

पालकमंत्र्यांनी प्रॉपर्टीची माहिती लपवली; सरकारचा महसूल बुडविला

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

पालकमंत्री सतेज पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रतिज्ञापत्रात अपुरी आणि खोटी माहिती देऊन शासनाचा महसूल बुडवल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते, माजी खासदार धनंजय महाडिक यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.

याप्रकरणी त्यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी उच्च न्यायालयात गुरुवारी करणार आहे. ते कदाचित निवडून आले तरी तीन महिन्यांत त्यांची निवड रद्द होईल, त्यामुळे मतदारांनी विचार करूनच मतदान करावे, असे आवाहन महाडिक यांनी केले.

महाडिक म्हणाले, हॉटेल सयाजी आणि डी. वाय. पी. सिटी मॉल विकसनासाठी कॉसमॉस बँकेकडून घेतलेल्या सुमारे 80 कोटी कर्जाची माहिती दिलेली नाही. या मिळकतीचे महापालिकेला देय असलेल्या थकीत घरफाळ्याबाबत 25/2 प्रमाणे नोटीस बजावली आहे.

या मिळकतीचे वाटणीपत्र शंभर रुपयांच्या प्रतिज्ञापत्रावर करून सरकारचा 54 लाख रुपयांचा महसूल बुडविला आहे. ताराराणी चौक परिसरातील 23 हजार 639 चौरस फूट जागा आहे, असे म्हटले आहे. त्यामध्ये चार हिस्से आहेत. ही संपूर्ण दोन लाख 15 हजार 953 चौरस फूट जागा आहे. चौथा हिस्सा 53 हजार 958 चौरस फूट असूनही ही माहिती लपवली आहे.सत्तेचा वापर करून गैरव्यवहार केले आहेत. ते कदाचित निवडून आले तरी आम्ही गप्प बसणार नाही.

सर्वोच्च न्यायालय व केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार करून त्यांची निवड रद्द करू. उच्च न्यायालयात दाद मागताना हरकतीबाबत जिल्हाधिकारी आणि घरफाळा कारवाईबाबत महापालिका आयुक्तांनाही पार्टी करू, असेही महाडिक यांनी स्पष्ट केले. यावेळी माजी महापौर सुनील कदम, माजी नगरसेवक सत्यजित कदम, प्रा. जयंत पाटील उपस्थित होते.

जिल्हाधिकार्‍यांवर दबाव

महाडिक म्हणाले, शपथपत्राद्वारे खोटी माहिती दिल्याची तक्रार जिल्हाधिकार्‍यांकडे केली. हे सगळं माझ्या अधिकारात बसत नाही, असे त्यांनी सांगितले. राज्यात सत्ता असल्याने जिल्हाधिकार्‍यांवर प्रचंड दबाव दिसतो.

मतदान करताना विचार करा

उमेदवारी अर्ज भरताना सर्व संपत्ती, कर्ज शपथपत्राद्वारे सादर करायची असते. त्यानुसार अमल महाडिक यांचा अर्ज भरला होता. मात्र, सतेज पाटील यांनी माहिती लपविली. या कारणावरून त्यांचा उमेदवारी अर्ज फेटाळला जाऊ शकतो.

एक-दोन मताने आमचा पराभव झालाच तर आम्ही इलेक्शन रिटपिटीशन दाखल करून तीन महिन्यांत खोटी माहिती दिल्याबद्दल त्यांची निवड रद्द करू. मतदारांनी याचा विचार करूनच मतदान करावे, असे आवाहनही महाडिक यांनी यावेळी केले.

हेही वाचलं का?

Back to top button