शंभर कोटी मोबाईल फोन ‘पेगासस’च्या निशाण्यावर | पुढारी

शंभर कोटी मोबाईल फोन ‘पेगासस’च्या निशाण्यावर

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था

टेक कंपनी अ‍ॅपलने पेगासस  तयार करणार्‍या एनएसओ या इस्रायली कंपनीविरुद्ध खटला दाखल केला आहे. एनएसओ ही कंपनी एक अब्जाहून अधिक मोबाईल फोन्सना आपले लक्ष्य करीत असल्याचा दावा अ‍ॅपलने या खटल्यात केला आहे. जगभरात 1.65 अब्ज अ‍ॅपल डिव्हाईसेस कार्यरत आहेत, त्यापैकी एक अब्जाहून अधिक मोबाईल फोन आहेत.

एनएसओवर याआधीही अनेक खटले दाखल झाले आहेत. कंपनीचे पेगासस स्पायवेअर गेल्या काही दिवसांपासून भारतासह अनेक देशांत वादाचा केंद्रबिंदू ठरले आहेत. चळवळीतील कार्यकर्ते, आंदोलक, पत्रकार तसेच राजकीय नेत्यांची हेरगिरी या स्पायवेअरच्या माध्यमातून केल्याचा आरोप आहे.

एनएसओ अमेरिकेत ब्लॅक लिस्टमध्ये

एनएसओला अमेरिकन सरकारने ब्लॅक लिस्टमध्ये टाकले आहे. आता एनएसओ समूहावर कायमस्वरूपी बंदी आणावी, अशी याचिका कॅलिफॉर्नियातील मध्यवर्ती न्यायालयात अ‍ॅपलने दाखल केली आहे.

पेगासस स्पायवेअर काय?

हेरगिरी, पाळत ठेवणे आदी कामांसाठी वापरले जाणारे पेगासस एक स्पायवेअर आहे. स्पायवेअरच्या माध्यमातून मोबाईल फोन हॅक केला जाऊ शकतो. कॅमेरा, माईक, मेसेजेस् आणि कॉल्ससह सर्व माहिती यामुळे हॅकर्सकडे उपलब्ध होते. एक मिसकॉल करूनही हे स्पायवेअर समोरच्या व्यक्तीच्या फोनमध्ये इन्स्टॉल करता येऊ शकते, हे विशेष! व्हॉटस्अ‍ॅप मेसेज, टेक्स्ट मेसेज, एसएमएस, सोशल मीडियाच्या माध्यमातूनही हे वेअर तुमच्या फोनमध्ये शिरू शकते!

स्पायवेअर कसा ओळखावा?

1)तुमचा मोबाईल अनपेक्षित व्यवहार करत असेल, मेमरी करप्ट झाली असेल, व्हॉटस्अ‍ॅप वा टेलिग्राम मेसेजेस् अचानकपणे डिलीट होऊ लागले असतील वा फोन वेगाने गरम होत असेल तर गडबड आहे, असे समजावे.

2)पेगासस हे अद्ययावत स्पायवेअर आहे. असे टूल्स शोधून काढायचे तर त्यासाठी फोरेन्सिक पृथ:करण करावे लागते. टूलकिटनेही तपासणी केली जाते

हेही वाचलं का?

Back to top button