सांगली : मणेराजुरीतील ‘त्या’ तिघांची आत्महत्या लग्नाच्या वादातून?, हार, गुच्छ सापडल्याने संशय बळावला | पुढारी

सांगली : मणेराजुरीतील 'त्या' तिघांची आत्महत्या लग्नाच्या वादातून?, हार, गुच्छ सापडल्याने संशय बळावला

तासगाव, पुढारी वृत्तसेवा : मणेराजुरी (ता. तासगाव) येथील शेकोबा डोंगरावर गुरुवारी तिघांनी केलेल्या आत्महत्येची घटना प्रेमाच्या त्रिकोणातून झाली असावी, असे पोलिस तपासात समोर येत आहे. या घटनेने पोलिसही चक्रावून गेले आहेत आणि परिसरात खळबळ उडाली आहे.

गुरुवारी सकाळी मणेराजुरी शेजारच्या डोंगरावर हरिश जमदाडे, प्रणाली पाटील (रा. मणेराजुरी, ता. तासगाव) व शिवानी घाडगे (रा. हतीद, ता. सांगोला) या तिघांनी विषारी द्रव पिऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले होते. आत्महत्या केलेले हरिश जमदाडे, प्रणाली पाटील हे स्थानिक असल्याने त्यांची ओळख पटविण्यात अडचण आली नाही. शिवानी घाडगे हिचेही मणेराजुरी येथे नातेवाईक असल्याने तिचेही या गावात येणे-जाणे होते. त्यामुळे तिची ओळख पटली.

पण तिघांनी एकाच वेळी एकाच ठिकाणी का आत्महत्या केली? याबाबत तर्कवितर्क व्यक्त होत आहेत. हरिश व प्रणाली यांच्यात प्रेम संबंध होते. त्यातून प्रणाली हिच्याशी हरिश हा लग्न करणार असावा असा अंदाज आहे. लग्नाच्या उद्देशानेच तिने त्यावेळी नवी साडी नेसली असावी असा पोलिसांचा कयास आहे. लग्न करण्याच्या उद्देशानेच त्यांनी हार, गुच्छ सोबत घेतले असावेत या निष्कर्षापर्यत पोलिसांचा तपास आला आहे.

कारण हार-गुच्छ आत्महत्येच्या ठिकाणी आढळले आहेत. मात्र ही साडी आणि हार-गुच्छ त्यांनी नेमके केव्हा खरेदी केले, तसेच कुठे खरेदी केले त्याचीही मणेराजुरी व परिसरात चौकशी सुरू आहे. लग्न करण्याच्या कारणावरून त्यांच्यात काही वाद झाला होता का याचीही पोलिस खातरजमा करीत आहेत.

त्याचबरोबर शिवानी या ठिकाणी हतीद येथून केव्हा, का व कशी आली याचीही माहिती पोलिसांना अजून मिळालेली नाही. तिची अन्य कोणाशी ओळख किंवा काही संपर्क होता का, ते पोलिस तपासून पाहत आहेत. शिवानी ही तिच्या हतीद येथील घरातून कधी निघून आली याबाबत तिचे घरचेही अनभिज्ञ असल्याचे तपासात समोर येत आहे. मात्र, तिने घर सोडण्यापूर्वी घरी चिठ्ठी लिहून ठेवली असल्याची माहिती तिच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिली आहे. अर्थात या चिठ्ठीबाबतही पोलिस शंका उपस्थित करीत आहेत. तसेच चिठ्ठीतील मजकुराची खातरजमा करीत आहेत.

पोलिस हरिश जमदाडे याच्या मागावर होते

हरिश जमदाडे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्याच्याबद्दल पोलिसात काही तक्रारी होत्या .पोलिस त्याच्या मागावर होते. परंतु, तो पोलिसांच्या हाताला लागत नव्हता. सतत तो बाहेरगावी फिरत असे. पोलिस आणि त्याचा पाठशिवणीचा खेळ सुरू होता. अशीही माहिती पोलिस तपासात समोर येत आहे. घटनास्थळी हरिश, प्रणाली आणि शिवानी या तिघांचेही मोबाईल सापडले आहेत. या मोबाईलचा सिडीआर रिपोर्ट आल्यावरच या घटनेची स्पष्टता होणार आहे. तपासाधिकारी त्या रिपोर्टच्या प्रतीक्षेत आहेत.

मणेराजुरी येथील एक युवक आणि दोन युवतींचा मृत्यू ही आत्महत्याच आहे. परंतु, त्या ठिकाणी शिवानी ही युवती कशी आली, याबाबत तपास सुरू आहे. तिने लिहिलेल्या चिठ्ठीची खातरजमा केली जात आहे.
– संजीव झाडे, पोलिस निरीक्षक, तासगाव

हेही वाचलत का? 

Back to top button