कोल्हापूर जिल्हा बँक निवडणुकीचे गावोगावी पडघम | पुढारी

कोल्हापूर जिल्हा बँक निवडणुकीचे गावोगावी पडघम

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी आघाडी आणि शिवसेना यांच्यात ठरावधारकांपर्यंत पोहोचण्याची चुरस लागली आहे. तालुक्यातील एकगठ्ठा ठरावधारक सत्ताधार्‍यांकडे असले, तरी गाफीलपणा नडू शकतो. यामुळेच सत्ताधारी आघाडी सतर्क आहे. शिवसेना ईर्ष्येने निवडणुकीत उतरल्याने राजकारण ढवळून निघत आहे. गावोगावी जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय पडघम वाजू लागल्याचे चित्र आहे.

जिल्हा बँकेत 21 पैकी सहा संचालक बिनविरोध झाल्याने उर्वरित 15 जागांसाठी 33 उमेदवार रिंगणात आहेत. 5 जानेवारीला मतदान होईल. सत्ताधारी आघाडीने संस्था गटातील आतापर्यंत सहा जागा बिनविरोध केल्या आहेत. शिवसेना संस्था गटातील दोन आणि सर्वसाधारण गटातील नऊ अशा अकरा जागांवर लढत आहे. राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि माजी खासदार निवेदिता माने यांनी शिवसेनेची साथ सोडून सत्ताधारी आघाडीसोबत लढण्याचा निर्धार केला आहे. अधिकाधिक जागा निवडून आणून आपला निर्णय योग्य असल्याचा दाखवण्याचा सेनेचा प्रयत्न आहे.

विकास सोसायटी गटात 1866, प्रक्रिया संस्था गटात 449, नागरी पतसंस्था, बँका गटात 1221, पाणीपुरवठा इतर संस्था गटात 4111 असे एकूण 7647 मतदार जिल्हा बँकेसाठी मतदानासाठी पात्र आहेत. तालुक्यातील संस्था गटात सत्ताधारी आघाडीचे वर्चस्व असल्याचे चित्र आहे. शिवसेनेने सत्ताधारी आघाडीविरोधात जोरदार आघाडी उघडली आहे. तालुक्यातून अधिकाधिक ठरावधारक आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

शिवसेना आणि सत्ताधारी आघाडीत कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे. आक्रमक झालेल्या सेनेने निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैर्‍या झाडण्यास सुरुवात केली आहे. सत्ताधारी आघाडीचे नेते, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर आणि निवेदिता माने हे सेना पदाधिकार्‍यांच्या रडारवर असल्याचे चित्र टीकेतून स्पष्ट होत आहे. सेनेच्या टिकेला सत्ताधार्‍यांनी प्रत्युत्तर दिले नसले, तरी येत्या काळात संघर्ष वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा बँकेतील वाढत्या राजकीय ईर्ष्येमुळे व प्रचारामुळे ग्रामीण भागात निवडणूक फिव्हर चढू लागल्याचे चित्र आहे.

Back to top button