भीषण अपघात : नगर : दोन कारची समोरा-समोर धडक, महिला जागीच ठार | पुढारी

भीषण अपघात : नगर : दोन कारची समोरा-समोर धडक, महिला जागीच ठार

श्रीगोंदा; पुढारी ऑनलाईन : नगर-दौंड राष्ट्रीय महामार्गावरील पारगाव फाटा शिवारात आज (शनिवार) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास दोन चार चाकी वाहनांच्या धडकेत एक महिला जागीच ठार झाली. या भीषण अपघातात इतर पाचजण जखमी झाले आहेत. जखमींना दौंड व श्रीगोंदा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान मृत महिला हिमाचल प्रदेश येथील असल्याची प्राथमिक माहिती समजते.

याबाबत प्राथमिक माहिती अशी की, हिमाचल प्रदेश येथील पती- पत्नी आपल्या दोन मुलांसह गोवा येथे निघाले होते. त्यांची चाराचाकी सकाळी आठच्या सुमारास पारगाव फाटा नजीक आली असता, बारामती वरून नगरच्या दिशेने निघालेल्या चाराचाकी वाहनाची त्‍यांच्या समोरासमोर जोराची धडक झाली. धडक एवढी जोराची होती की, एका वाहनातील महिला जागीच ठार झाली. तर इतर पाचजण जखमी झाले आहेत. जखमींना श्रीगोंदा व दौंड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, अपघात झाल्यानंतर प्रत्यक्षदर्शीनी रुग्णवाहिकेस फोन करून माहिती दिली. अर्ध्या तासानंतर रुग्णवाहिका आली मात्र रुग्णवाहिकेसोबत वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णवाहिका चालकाने जखमींना नेण्यास असमर्थता दर्शवली. तिथे उपस्थित असलेल्या शुभम वाडगे, किरण शिंदे, अक्षय जाधव, मयूर जाधव, गणेश पवार या तरुणांनी मदत करत जखमींना रुग्णालयात दाखल केले.

Back to top button