माडग्याळ(सांगली) ; पुढारी वृत्तसेवा : जत तालुक्यातील माडग्याळच्या देशी शेळ्या, मेंढ्यांनी महाराष्ट्रासह इतर राज्यात आपले वर्चस्व निर्माण केले आहेच. आता याच मातीतील माडग्याळ देशी बोरांची चव निराळी असून त्याची बाजार पेठेत मागणी वाढू लागली आहे. माडग्याळ देशी बोरांनी आपला वेगळाच ब्रॅंड निर्माण केला आहे.
जत तालुक्यात माडग्याळ गावात प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतातील बांधावर झाडे लावली आहेत. ही देशी झाडे आहेत. यास पाणी दिले जात नाही कोणत्याही परिस्थितीत किंवा एखाद्या पावसावर ही झाडे जगतात. बोराची चव गोड, थोडं आंबट, तसेच एक बोर खाल्यावर अजून एक बोर खाण्याचा मोह आवरत नाही, ही बोर आकाराने लहान असतात; परंतु गाभा खाल्यावर वेगळीच मज्जा येते. तोंडाची चव जात नाही.
ऑक्टोबर ते जानेवारी या महिन्यांत संक्रांतीच्या दिवसांपर्यंत हा बोरांचा हंगाम असतो. आवडीने खाणाऱ्या ग्राहकांचीही यांना तेवढीच मागणी असते. जत तालुक्यासह सांगली, बेळगाव, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, मंगळवेढा, पंढरपूर, कर्नाटकातील विजापूर, अथणी, जमखंडी, आदी ठिकाणी बोर विक्रीसाठी पाठवली जातात.
सध्या या बोरांना प्रतिकिलो 50 ते 90 रुपये इतका दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना कमी खर्चात चांगले उत्पन्न मिळत आहे. यासह माडग्याळच्या बोराची चव राज्यातील इतर कोणत्याही बोरापेक्षा सरस आहे. त्यामुळे शेळ्या-मेंढ्यांच्या व्यापारासाठी कर्नाटक व केरळसह राज्यभरातून येणाऱ्या प्रत्येक व्यापार्याला ही बोरांचा मोह आवरत नाही, तो ही बोरे आवर्जून घेऊन जातो.यापूर्वी बोरांच्या बियांवर झाडे उगवून यायची. याकडे शेतकऱ्यांचे बरेचसे दुर्लक्ष व्हायचे. आता शेतकऱ्यांमध्ये यामध्ये याबद्दल या झाडांचा खोडवा निर्माण करून त्याची लागण करीत आहेत. या बोरांमध्ये आणखी तीन ते चार प्रकार आहेत.
हेही वाचलत का?