कर्नाटक सरकारचा निषेध : मराठीवरील अन्यायाचा संसदेत आवाज | पुढारी

कर्नाटक सरकारचा निषेध : मराठीवरील अन्यायाचा संसदेत आवाज

नवी दिल्‍ली ; पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना क्षुल्‍लक बाब म्हणणारे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि सीमाभागात मराठी जनतेवर होत असलेल्या अन्यायाविरोधात शिवसेनेच्या खासदारांनी मंगळवारी संसदेत आवाज उठवला. कर्नाटक की मराठी जनता को न्याय दो, अशा आशयाचे फलकही संसदेत दर्शवत कर्नाटकाचा निषेध नोंदवला.

माजी मंत्री अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, धैर्यशील माने, हेमंत गोडसे यांनी संसदेत आवाज उठवला.

बंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. त्यानंतर शिवसेना आक्रमक झाली असून शिवसेनेने याबाबत आक्रमकपणे भूमिका मांडण्यास सुरुवात केली आहे.

शिवसेना खासदारांनी सदनात ‘न्याय दो, न्याय दो, कर्नाटक की मराठी जनता को न्याय दो’, ‘कर्नाटक राज्य के मुख्यमंत्री बोम्मई इस्तीफा दो’, ‘मराठी जनता पर अन्याय करने वाली कर्नाटक सरकार हाय हाय’, ‘नही सहेंगे, नही सहेंगे, छत्रपती शिवाजी महाराज का अपमान नही सहेंगे’ अशा आशयाचे फलक दाखविले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेनंतर या घटनेला छोटीशी घटना म्हणून वक्तव्य करणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या विरोधातही आवाज उठविण्यात आला.

चार दिवसांपूर्वी सीमाभागातून महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा शिष्टमंडळ तालुका समिती युवा आघाडी अध्यक्ष संतोष मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली दिल्‍लीला गेले होते. त्यावेळी शिवसेना खासदारांची भेट घेवून मध्यवर्ती समिती अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर झालेला हल्‍ला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना याविषयावर सविस्तर माहिती देवून संसदेत आवाज उठवण्याची मागणी केली होती. महाराष्ट्रातही पडसाद उमटत आहेत.

सलग दुसर्‍या दिवशी…

सीमाभागात मराठी माणसांवर होत असलेला अन्याय आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विटंबनेविरोधात संसदेत चर्चा करण्यात यावी, अशी मागणी खासदार अरविंद सावंत यांनी केली होती. पण, चर्चेला वेळ देण्यात आला नाही. त्यामुळे सावंत यांनी सोमवारी कर्नाटक सरकारच्या निषेधाचे दर्शक दर्शवले होते.

Back to top button