पेपर फुटीचे कनेक्शन मंत्रालयापर्यंत : रॅकेटचा गॉडफादर वेगळाच | पुढारी

पेपर फुटीचे कनेक्शन मंत्रालयापर्यंत : रॅकेटचा गॉडफादर वेगळाच

इस्लामपूर ; पुढारी वृत्तसेवा : पेपर फुटीचे कनेक्शन : एमपीएससी व म्हाडाच्या पेपर फुटीचे कनेक्शन मंत्रालयापर्यंत असून या रॅकेटचा गॉडफादर वेगळाच आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत बोलताना केली.

विक्रांत पाटील म्हणाले, हे महाविकास आघाडी सरकार विद्यार्थी व युवा वर्गाचे वाटोळे करायला लागले आहे. केवळ तुंबडी भरण्याचेच काम त्यांच्याकडून सुरु आहे. त्यामुळे युवा वर्गाचे प्रश्न घेवून आम्हाला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला आहे.

पेपर फुटीचे कनेक्शन मंत्रालय

राज्यातील पेपर फुटीचे थेट कनेक्शन मंत्रालयापर्यंत आहे, असा आरोप करुन ते म्हणाले, या रॅकेटचा गॉडफादर वेगळाच आहे. याचा शोध हे सरकार घेणार नाही. त्यामुळे या सर्व प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी आम्ही राज्यपालांच्याकडे केली आहे.

ते म्हणाले, शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचे छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल बेगडी प्रेम आहे. मंगळूर येथे छत्रपतींच्या पुतळ्याची विटंबना करणारा काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि इकडे मात्र हे पक्ष छत्रपतींच्या पुतळ्यास दुधाचा अभिषेक घालून नौटंकी करत आहेत.

त्यांना खरेच महाराजांच्याबद्दल आदर असेल तर त्यांनी सरकारमधून काँग्रेस थेटरमधल्या पक्षाची हकालपट्टी करण्याची हिम्मत दाखवावी. प्रदेश उपाध्यक्ष राहूल महाडीक, सचीव जयराज पाटील, प्रविण फोंडे, सुजीत थोरात आदी यावेळी उपस्थित होते.

हेही वाचलत का?

Back to top button