सांगली : इस्लामपूर पालिकेच्या सभागृहात अभूतपूर्व गोंधळ | पुढारी

सांगली : इस्लामपूर पालिकेच्या सभागृहात अभूतपूर्व गोंधळ

इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा :  भुयारी गटर योजनेचे काम सुरु करण्यावरुन इस्लामपूर पालिकेच्या सभागृहात अभूतपूर्व गोंधळ झाला. सत्ताधारी विक‍ास आघाडीच्या नगरसेवकांनी भुयारी गटरचे काम सुरु केल्याशिवाय सभेचे कामकाज सुरु करु न देण्याची भुमिका घेत जोरदार घोषणाबाजी केली. त्याला विरोधी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनीही घोषणाबाजी करत प्रत्युत्तर दिले. या गोंधळामुळे सभा काहीकाळ तहकूब करण्यात आली.

नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी वैभव साबळे यांच्या उपस्थितीत बुधवारी तहकूब विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. सभेला सुरवात होताच पक्षप्रतोद विक्रम पाटील, वैभव पवार, अमीत आोसवाल, शकील सय्यद , प्रदीप लोहार यांनी ज्या विषयासाठी सभा तहकूब झाली त्या विषयाचे काय झाले?

तीन महिन्यापुर्वी भुयारी गटरचे काम सुरु करण्याचा ठराव करुनही प्रशासनाने काम सुरु का केले नाही. कोणाच्या तरी दबावामुळे काम सुरु करण्यास विलंब होत असल्याचा आरोप करत ‘ भुयारी गटर योजनेचे काम सुरु झालेच पाहिजे’ अशी घोषणाबाजी सुरु केली.

त्याला राष्ट्रवादीचे गटनेते संजय कोरे, शहाजी पाटील, चिमण डांगे, विश्र्वास डांगे, खंडेराव जाधव यांनीही घोषणाबाजीने प्रत्युत्तर दिले. त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ सुरु झाला. त्यामुळे नगराध्यक्ष पाटील यांनी सभागृहाचे कामकाज काही काळासाठी तहकूब केले. सभागृहात गोंधळाची परंपरा नाही, सभागृहाचे सदस्यांनी पावित्र्य राखावे असे आवाहन नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी सदस्यांना केले.

हेही वाचलं का?

Back to top button