सोलापूर : जिल्ह्यात 5 नगरपंचायतींसाठी आजपासून उमेदवारी अज | पुढारी

सोलापूर : जिल्ह्यात 5 नगरपंचायतींसाठी आजपासून उमेदवारी अज

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा : सोलापूर जिल्ह्यातील पाच नगरपंचायतींच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली. आजपासून (बुधवार) पाच नगरपंचायतींसाठी नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्यात येणार आहेत. जिल्हाधिकार्‍यांनी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या नेमणुका केल्या आहेत. त्यामध्ये उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी नेमल्याने तहसीलदारांवरील ताण कमी झाला आहे.

त्यामुळे पाचही नगरपालिकांच्या निवडणुकीची आजपासून खर्‍या अर्थाने रणधुमाळी सुरू होणार आहे. वैराग नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रांताधिकारी हेमंत निकम यांची माढा नगरपंचायतीसाठी प्रांताधिकारी ज्योती कदम यांची माळशिरससाठी प्रांताधिकारी आणि कैलास केंद्रे, श्रीपूर-महाळुंगसाठी भूसंपादन अधिकारी नागेश पाटील आणि धैर्यशील पाटील, नातेपुतेसाठी अनिल कारंडे व तहसीलदार खांडेकर यांची नेमणूक करण्यात आली आहे.

पाच नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 21 डिसेंबर रोजी मतदान, तर 22 डिसेंबर मतमोजणी होणार आहे. त्यासाठी संबंधित नगरपंचायतींच्या क्षेत्रात 24 नोव्हेंबरपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे. त्यासाठी 1 ते 7 डिसेंबर 2021 याकालावधीत नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्यात येतील.

नामनिर्देशनपत्रांची छाननी 8 डिसेंबर रोजी होणार आहे. 21 डिसेंबरला सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदान होणार आहे. 22 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी होणार आहे. कोरोना-19 संदर्भात केंद्र व राज्य शासनाने ठरवून दिलेल्या निकषांनुसार व आवश्यक त्या उपाययोजना करून या निवडणुकांचा कार्यक्रम राबविण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने केल्या आहेत.

दरम्यान, निवडणुका लागलेल्या नगरपंचायतींच्या हद्दीत आता राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. राजकीय बैठकांना वेग आला आहे. तालुक्यातील विविध राजकीय पक्षांनी आता नेत्यांना बोलावून गटा-तटातील वाद मिटविण्यास सुुरुवात केली आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक तसेच विविध राजकीय पक्षांमध्ये आता राजकीय फैरी झडू लागल्या आहेत.

Back to top button