सांगली ः बेलगाम घोड्यांच्या टाचेला लगाम कधी? | पुढारी

सांगली ः बेलगाम घोड्यांच्या टाचेला लगाम कधी?

सांगली ः पुढारी वृत्तसेवा : शासनाने घोड्यांच्या शर्यतीवर बंदी घातली आहे. मात्र, तरीही अनेक गावांत बिनधास्तपणे शर्यती भरवल्या जात आहेत. जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने घोडे पोसणार्‍यांचे धाडस दिवसेंदिवस वाढत चालले आहे, असा आरोप वाहनधानक व नागरिकांतून होत आहे.

अनेक गावांत सातत्याने घोड्यांच्या शर्यतीचे आयोजन करण्यात येत आहे. शर्यतीवेळी घोड्यांना बेदम मारहाण केली जाते. अगदी रक्तस्राव झाला तरीही मारहाण सुरूच असते. काहीवेळा विद्युत शॉक दिला जातो. बहुसंख्य शर्यतीवेळी घोडे मालकांमध्ये टोकाची भांडणे होत असतात.

प्रत्येक गावामध्ये शासनाकडून पोलिस पाटील यांची नेमणूक केली आहे. तसेच पोलिसांच्या खबर्‍यांचे जाळेही जिल्ह्यात मोठे आहे. त्यामुळे पोलिसांनी मनात आणल्यास घोड्यांच्या शर्यतींची माहिती त्यांना क्षणात मिळू शकते. मात्र, शर्यतीचे आयोजन करणारे आणि घोडे मालकांवर का कारवाई होत नाही, हा एक संशोधनाचा विषय बनला आहे.

गेल्या काही वर्षांत घोडे पाळणार्‍यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. प्रामुख्याने तरुण पिढी यामध्ये अधिक गुंतल्याचे दिसत आहे. शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात रस्त्यावर मोकाट घोड्यांचा सुळसुळाट झाला आहे. याच घोड्यांमुळे जीवघेणे अपघात होत आहेत.

रस्त्यावर मोकाट वावरणार्‍या घोड्यामुुळे पादचारी व वाहनचालकांच्या डोक्यावर अपघाताची कायम टांगती तलवार आहे. सांगली-इस्लामपूर मार्गावर दिवस- रात्र बेलगाम घोडे धावत असतात. यामुळे आतापर्यत अनेक वेळा किरकोळ अपघात झाले आहेत. मात्र कधीही जीवघेणे अपघात होऊ शकतात, अशी स्थिती आहे.

सांगली शहरात अनेक मार्गांवर मोकाट घोड्यांचा मोठा वावर आहे. वाहनधारकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. सांगली- मिरज, सांगली-कोल्हापूर, सांगली-माधवनगर, अशा विविध मार्गांवर दिवस-रात्र घोडे मोकाट फिरत आहेत. महापालिकेने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. तातडीने मोकाट घोड्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

मिरज पश्चिम भाग बनलाय घोड्यांचे माहेरघर

मिरज पश्चिम भागातील समडोळी, कवठेपिरान, दुधगाव, सावळवाडी, माळवाडी, कसबे डिग्रज, तुंग, मौजे डिग्रज गावांत घोडे पाळणार्‍यांची संख्या मोठी आहे. आठवड्यातून दोन ते तीन वेळा या भागात घोड्यांच्या शर्यती होतात. परवानगी नसताना बेधडकपणे हा उद्योग या भागात सुरू आहे. सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत मिरज पश्चिम भाग येतो. त्यामुळे ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक यांनीच यामध्ये तातडीने लक्ष घालण्याची मागणी होत आहे.

Back to top button