सांगली: जिल्ह्यात 34 निलंबित, एकाची सेवासमाप्ती | पुढारी

सांगली: जिल्ह्यात 34 निलंबित, एकाची सेवासमाप्ती

सांगली ः पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात सलग 22 दिवस संप सुरू असल्यामुळे महामंडळाकडून सोमवारी 34 जणांचे निलंबन करण्यात आले. तर मिरज आगारातील एका चालकाची सेवासमाप्ती करण्यात आली. दिवसभरात दहा आगारातून 284 एस.टी. व खासगी शिवशाही सोडण्यात आल्या.

भरघोस पगारवाढ दिल्यानंतर सेवेत रुजू होण्याचे महामंडळाकडून आवाहन करण्यात आले आहे; परंतु अद्याप काही कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. सोमवारी सांगलीतील संपाचा 22 वा दिवस होता. अद्यापही काही कर्मचार्‍यांकडून संप करण्यात येत आहे.

त्यामुळे कवठेमहांकाळ 10, विटा 8, तासगाव 13 आणि जत आगारातील 3 अशा 34 कर्मचार्‍यांचे निलंबन करण्यात आले. आतापर्यंत 380 कर्मचार्‍यांचे निलंबन करण्यात आले आहे; परंतु यामधील 140 कर्मचारी कामावर हजर झाल्याने त्यांचे निलंबन महामंडळाकडून मागे घेण्यात आले आहे.

मिरज आगारातील एका चालकाची सेवासमाप्ती करण्यात आली. आतापर्यंत जिल्ह्यातील 82 कर्मचार्‍यांची सेवासमाप्ती करण्यात आली आहे. दिवसभरात सर्व दहा आगारातून 380 एस. टी. व खासगी शिवशाही सोडण्यात आल्या. यामध्ये सांगली आगारातून ग्रामीण 33, शहरी 13 आणि खासगी शिवशाही 33 गाड्या सोडण्यात आल्या. मिरज आगारातून ग्रामीण 21, शहरी 16 आणि खासगी शिवशाही 8, इस्लामपूर आगारातून 45, विटा 30, तासगाव 18, जत 16, आटपाडी 13, कवठेमहांकाळ 22, शिराळा 16 आणि पलूस आगारातून 26 अशा एकूण 284 गाड्या सोडण्यात आल्या.

पगारवाढ फसवी, कर्मचार्‍यांनी बळी पडू नये : नितीन शिंदे

माजी आ. नितीन शिंदे म्हणाले, राज्य सरकारने विलीनीकरणाबाबत निर्णय घ्यावा, काही जणांनी संप मोेडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याला कर्मचार्‍यांनी बळी पडू नये, 41 टक्के दिलेली पगारवाढ ही फसवी आहे. प्रत्यक्षात 8 टक्केच पगारवाढ मिळणार आहे.

Back to top button