स्त्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्या ‘प्रिन्सेस इंदुमतीदेवी’ यांनी केलेल्या कार्याचा आढावा | पुढारी

स्त्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्या ‘प्रिन्सेस इंदुमतीदेवी’ यांनी केलेल्या कार्याचा आढावा

विश्वास काटकर

स्त्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्या प्रिन्सेस इंदुमतीदेवी राणीसाहेब यांच्या 50 व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेले कार्य याचा संक्षेपाने घेतलेला आढावा…

थोर समाजसुधारक व स्त्री शिक्षणाची तळमळ असणार्‍या कोल्हापूर राजघराण्यातील एक प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून प्रिन्सेस इंदुमतीदेवी राणीसाहेब यांचा उल्लेख केला जातो. ज्यांनी परंपरेला झुगारून इतिहास घडविला, त्यापैकी प्रिन्सेस इंदुमतीदेवी होय. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या त्या धाकट्या स्नुषा.

राणी इंदुमतीदेवी यांचा जन्म 6 डिसेंबर 1906 रोजी सासवड येथील जगताप घराण्यामध्ये झाला. सर्वसामान्य कुटुंबातील असूनही शाहू महाराजांनी आपले धाकटे सुपूत्र प्रिन्स शिवाजी महाराज यांच्याशी इंदुमतीदेवी यांचा 6 जून 1917 रोजी विवाह केला. दुर्दैवाने 12 जून 1918 मध्ये प्रिन्स शिवाजी महाराज शिकारीस गेले असता त्यांचा अपघाती मृत्यू झाला. अवघ्या 12 व्या वर्षी इंदुमतीदेवी विधवा झाल्या.

बालवयातच इंदुमतीदेवी यांच्यावर कोसळलेल्या या दुःखाने शाहू महाराज चिंतेत होते. इंदुमतीदेवी यांना स्वतःचे संरक्षण करावयाचे असेल तर त्यांनी शिकले पाहिजे, याच विचाराने प्रेरित होऊन महाराजांनी इंदुमतीदेवी यांना शिक्षण देणे सुरू केले. सोनतळी कॅम्पमध्ये शिकवण्या घेऊन इंदुमतीदेवी यांना मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण दिले. शिक्षण घेत असताना त्यांनी स्त्री शिक्षणामध्ये येणार्‍या अडचणी व स्त्री समस्या यांचा अभ्यास केला. त्यातूनच ललित विहार, शांतादेवी गायकवाड गृह शास्त्र संस्था, अध्यापिका विद्यालय, बालमंदिर यासारख्या अनेक शिक्षण संस्था उभारल्या गेल्या.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्त्री शिक्षण चळवळीस प्रिन्सेस इंदुमतीदेवी यांनी मूर्तस्वरूप दिले. शिक्षणाप्रमाणे नाट्य संगीत, हस्तकला, चित्रकला याविषयी त्यांना प्रचंड जिज्ञासा होती. माँटेसरी इंटरनॅशनल या संस्थेच्या त्या भारतातील अध्यक्ष होत्या. आपला राहता बंगला सध्याचे सर्किट हाऊस त्यांनी शासनाला दिले. त्यांचे कार्य पुढील पिढीस निश्चितच प्रेरणादायी आहे.

त्यांचे 30 नोव्हेंबर 1971 रोजी कोल्हापूर येथे निधन झाले. त्यांच्या 50 व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना भावपूर्ण विनम्र अभिवादन.

हेही वाचा

 

Back to top button