सांगली : जिल्ह्यात मटका, जुगार, सट्टा जोमात | पुढारी

सांगली : जिल्ह्यात मटका, जुगार, सट्टा जोमात

सांगली ः पुढारी वृत्तसेवा : सांगली, मिरज, कुपवाडसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी जुगार, मटका अड्डे पुन्हा एकदा जोमात सुरू झाले आहेत. यामध्ये तरुणाई आहारी जाण्याचा धोकआहे. कोरोनाच्या काळात अनेकांच्या हातचा रोजगार गेला आहे.

रस्त्यावरील धंदा बंद झाल्याने अनेकांना पैशाची चणचण भासू लागली. त्यामुळे अनेक जण झटपट पैसा मिळवण्यासाठी या वाम मार्गाकडे वळत असल्याचे दिसून येतेे. विशेषतः मिरज तालुक्याच्या पश्चिम भागातील हे प्रकार वाढत आहेत. शहरात, गावातील मोकळ्या जागा, पडक्या इमारती जुगाराबहाद्दरांनी आपले अड्डे बनविले आहेत.

त्या ठिकाणी तीन पानी जुगाराचा डाव मांडला जातो. जुगार जोमात सुरू झाल्याने पोलिसांनी देखील कंबर कसली असून अनेक ठिकाणी धाडी टाकून जुगार अड्डे उद्ध्वस्थ केल्याचे दिसून येतेे. काही जणांवर कारवाई देखील केली आहे; परंतु अजूनही काही प्रमख मोहरे आणि त्यांचे पंटर जुगार अड्डे चालवित आहेत.

पोलिसांनी मुळावर घाव घालत मोहर्‍यांचे आणि पंटारांचे कंबरडे मोडणे गजरेचे आहे. जुगार अड्ड्यासह क्लब देखील चालविण्यात येत आहेत. त्याठिकाणी गुन्हेगारांचा मोठ्या प्रमाणात राबता असल्याचे दिसून येते.

तसेच सांगली, मिरज शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील जुगार फोफावला आहे. काही वर्षांपूर्वी जुगार चालकांवर जोरदार कारवाई करीत त्यांची डिजिटल चौकात लावलेली होती. त्या पद्धतीने कारवाई करणे गरजेचे आहे.

किरकोळ पंटरवर कारवाई; बडे मासे मोकाटच

राजकीय नेत्यांच्या वरदहस्तामुळे काही ठिकाण जुगार अड्डे, व्हिडीओ पार्लर चालविण्यात येत आहेत. पोलिसांकडून कारवाई होते. त्यात किरकोळ पंटर पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल होताना दिसतात; मात्र यामागचे खरे सूत्रधार आणि बडे मासे यांच्यावर कारवाई होत नाही. ते मात्र मोकाट फिरत आहेत. त्यातील काहीजण सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आहेत.

कारवाई टाळण्यासाठी अनेक जण राजकीय पक्षात

जुगार, मटका, गुटखा तस्करी, क्रिकेट सट्टा, खासगी सावकारी आदी अवैध धंदे करणारे अनेक जण गेल्या काही वर्षांत राजकीय पक्षात येत आहेत. आपल्यावर पोलिसांची कारवाई होऊ नये म्हणून ते राजकीय पक्षांच्या वळचणीला जात आहेत.

मटका, जुगार,जोमात

Back to top button