आमदार-खासदारांच्या गावातच गटारी तुंबल्या; तासगाव तालुक्यातील चित्र | पुढारी

आमदार-खासदारांच्या गावातच गटारी तुंबल्या; तासगाव तालुक्यातील चित्र

तासगाव; पुढारी वृत्तसेवा : आमदार सुमन पाटील यांच्या अंजनी आणि खासदार संजय पाटील यांच्या चिंचणी गावामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. ग्रामपंचायतींच्या दुर्लक्षामुळे दोन्ही गावात गटारी तुंबल्या आहेत. आरोग्य विभागाने ही बाब सातत्याने निदर्शनास आणून देऊनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

दोन्ही गावामध्ये गटारी लगतच्या परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे. ग्रामस्थांवर नाक दाबून घरातून बाहेर पडायची वेळ आली आहे. तसेच गटारीवर घोंगावणाऱ्या डासामुळे या गावामध्ये चिकून गुनिया, मलेरिया, डेंग्यू सारख्या रोगांची साथ पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.

अंजनी ग्रामपंचायतीवर आमदार सुमन पाटील तर चिंचणी ग्रामपंचायतीवर खासदार संजय पाटील यांची एकहाती सत्ता आहे. ही दोन्ही गावे लोकप्रतिनिधींची असल्याने येथील कारभाराकडे तालुका प्रशासनाकडून दुर्लक्षच केले जात असल्‍याची चर्चा आहे.

पावसाळा सुरु झाल्यापासून दोन्ही गावांत गटारी काटोकाट भरुन तुंबलेल्या आहेत. याच्या तक्रारी ग्रामस्थांनी अनेक वेळा केल्या आहेत. आरोग्य विभागानेही रोगराई पसरू नये म्हणून गावात स्वच्छता मोहिम राबविण्याची मागणी ग्रामपंचायतीकडे केली आहे. परंतू आमचे गाव हे लोकप्रतिनिधींचे गाव असल्याने प्रशासन कारभार करु शकत नाही, असा भ्रम झालेले सरपंच आणि ग्रामसेवक हे लोकांच्या मागणीला केराची टोपली दाखवत आहेत.

यामुळे गावात स्वच्छतेचा बोऱ्या वाजला आहेत. आता आमदार सुमन पाटील व खासदार संजय पाटील यांनी ही बाब गांभिर्याने घेऊन गावात स्वच्छता मोहिम राबविण्याचे आदेश द्यावेत,  अशी मागणी होत आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button