सांगली : मिरज शहर पोलिस ठाण्यात पेटवून घेतलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू | पुढारी

सांगली : मिरज शहर पोलिस ठाण्यात पेटवून घेतलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

सांगली : पुढारी वृत्तसेवा

मित्रांनी मारहाण केल्याची तक्रार देण्यासाठी आलेल्या सरफराज महमद अली जमखंडीकर (वय २६, रा. गुरुवार पेठ, मिरज) या तरुणाने पोलीस ठाण्यातच पेट्रोल ओतून घेऊन स्वतः ला पेटवून घेतले होते. ही घटना मंगळवारी रात्री मिरज शहर पोलिस ठाण्यात घडली. त्याच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

मंगळवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास सरफराज जमखंडीकर हा शहर पोलीस ठाण्यात मारहाणीची तक्रार देण्यासाठी आला होता. . यासीन, अबुबकर, आणि आयुब अशा तिघांनी मारहाण केली आहे. त्यांना आत्ताच अटक करा, असे तो म्हणून दंगा करीत होता.

त्याच्या म्हणण्यानुसार पोलीस ठाण्यातील काही पोलिसांनी त्याच्या सोबत जाऊन खातरजमा केली. सरफराज याने तुम्ही त्यांना आत्ताच अटक करा, मी पेटवतो असे म्हणून पेट्रोलची बाटली ओतून घेतली. व स्वतः ला पेटवून घेतले. पोलिसांनी तत्काळ आग विझविण्याचा प्रयत्न केला. सरफराज हा गंभीर भाजल्याने त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना आज त्याचा मृत्यू झाला.

 

Back to top button