कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ( कोल्हापूर जिल्हा बँक ) निवडणूक प्रक्रिया तातडीने सुरू करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी दिले. न्यायालयाच्या आदेशानंतर हालचाली गतिमान झाल्या आहेत. सोमवारी (दि. 29) निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन डिसेंबरअखेर मतदान आणि मतमोजणी पूर्ण होण्याची शक्यता आहे. याच प्रकरणाशी संबंधित आणखी एक सुनावणी 26 रोजी होणार आहे.
जिल्हा बँकेच्या ( कोल्हापूर जिल्हा बँक ) विद्यमान संचालक मंडळाची मुदत मे 2020 मध्ये संपली आहे; पण कोरोनामुळे सर्वच निवडणुका लांबणीवर पडल्या. राज्यातील 18 जिल्हा बँकांची लगबग सुरू झाली. कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि पुणे जिल्हा बँकांची निवडणूक प्रक्रिया एकाचवेळी सुरू झाली. कोल्हापूर जिल्हा बँकेची 27 सप्टेंबरला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध झाली होती. सहकार प्राधिकरणाकडे निवडणूक कार्यक्रमही सहकार विभागाने सादर केला होता. परंतु, कटऑफ डेटसह मतदारयादीतून वगळल्याच्या कारणास्तव सुमारे 60 हून अधिक संस्थांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ऑक्टोबर महिन्यात सर्व सुनावणी प्रक्रिया पूर्ण होऊन निकाल येणे बाकी होता.
दरम्यान, बँकेची निवडणूक प्रक्रिया ( कोल्हापूर जिल्हा बँक ) सुरू करण्यासाठी आजरा तालुक्यातील मडिलगे येथील शंकरलिंग विकास सेवा संस्थेने उच्च न्यायालयात निवडणूक घेण्याबाबत केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. न्यायालयाने तत्काळ निवडणूक कार्यक्रम जाहीर करून निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. याचिकाकर्त्या संस्थेतर्फे जी. एम. नाईक, बँकेतर्फे रवी कदम या वकिलांनी युक्तिवाद केला.
35 ते 45 दिवसांचा अवधी ( कोल्हापूर जिल्हा बँक )
बँक निवडणुकीची अंतिम मतदारयादीसह सर्व तयारी पूर्ण झाली आहे. सहकार निवडणूक प्राधिकरणाने कार्यक्रम जाहीर केल्यानंतर 35 ते 45 दिवसांच्या आत निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊ शकते.
द़ृष्टिक्षेपात जिल्हा बँक ( कोल्हापूर जिल्हा बँक )
गट मतदारसंख्या
विकास सोसायटी 1,866
प्रक्रिया संस्था 449
नागरी पतसंस्था, बँका 1,221
पाणीपुरवठा, इतर संस्था 4,111
एकूण 7,647