नवाब मलिक यांना हायकोर्टाने चाप; वानखेडे कुटुंबीयांना दिलासा | पुढारी

नवाब मलिक यांना हायकोर्टाने चाप; वानखेडे कुटुंबीयांना दिलासा

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : एनसीबीचे विभागीय संचलाक समीर वानखेडे यांच्यासंबंधी रोज नवे आरोप करून खळबळ उडवणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना मुंबई हायकोर्टाने चांगलाच चाप लावला. न्यायमूर्ती शाहरूख काथावाला आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने वानखेडे कुटुंबीयांविरोधात 9 डिसेंबरपर्यंत कोणतेही वादग्रस्त वक्तव्य करण्यास पासून मलिक यांना मनाई केली.

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर नवाब मलिक यांनी दरदिवशी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करण्यास सुरुवात केली. मलिक यांचे आरोप वानखेडे कुटुंबीयांनी फेटाळल्यानंतरही मलिक यांनी नवनवे दावे करणे सुरूच ठेवले. त्यामुळे ज्ञानदेव वानखेडे यांनी उच्च न्यायालयात मलिक यांच्या विरोधात सव्वा कोटी रुपयांचा दावा ठोकला.तसेच मलिक यांना आरोप करण्यापासून रोखा, अशी विनंती केली.

मात्र उच्च न्यायालयाच्या एक सदस्य न्यायालयाने मलिक यांना बोलण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट करत वानखेडे यांची विनंती फेटाळून लावली.याविरोधात ज्ञानदेव वानखेडे यांच्या वतीने अ‍ॅड.दिवाकर राय यांनी दोनसदस्यीय खंडपीठाकडे याचिका दाखल केली. त्या याचिकेवर गुरुवारी तातडीने सुनावणी झाली.

वानखेडेंच्या आईचे दोन मृत्यू दाखले कसे?

समीर दाऊद वानखेडे यांनी आईच्या मृत्यूनंतरही ‘फर्जीवाडा’ केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्‍ते नवाब मलिक यांनी केला आहे.
वानखेडे यांनी 16 एप्रिल 2015 रोजी आईवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मुस्लिम महिला असे प्रमाणपत्र घेऊन ओशिवरा मुस्लिम कब्रस्तानमध्ये अंत्यसंस्कार केले, तर दुसर्‍या दिवशी 17 एप्रिल 2015 रोजी मुंबई मनपाकडून हिंदू नावाचा मृत्यू दाखला घेतला आहे. हा परिवार मुस्लिम असताना दुहेरी ओळख कशी दाखवत आहे, असा सवालही मलिक यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.

एक दाखला मुस्लिम, तर दुसरा हिंदू नावाने : मलिक

अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र घेऊन सरकारी नोकरी मिळवली आणि आता परिवार मुस्लिम असतानाही आईच्या मृत्यूचा दाखला मनपाकडून हिंदू म्हणून घेतला आहे. दोन पद्धतींची ओळख वानखेडे कुटुंब ठेवत असल्याबद्दल मलिक यांनी आश्‍चर्य व्यक्‍त केले.

Back to top button