सांगली जिल्हा बँक निवडणुकीत देशमुखांच्या वर्चस्वाला तानाजी पाटील यांचा हादरा | पुढारी

सांगली जिल्हा बँक निवडणुकीत देशमुखांच्या वर्चस्वाला तानाजी पाटील यांचा हादरा

आटपाडी; पुढारी वृत्तसेवा

सांगली जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडीच्या तानाजी पाटील यांनी मोठ्या मताधिक्याने बाजी मारली. भाजपचे माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांचा पराभव करत तानाजी पाटील यांनी दणदणीत विजय मिळविला. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी सोसायटी गटातून महाविकास आघाडी मार्फत तानाजी पाटील आणि भाजपचे राजेंद्रअण्णा देशमुख यांच्यात लढत झाली. निवडणुकीपूर्वी झालेल्या राड्यामुळे जिल्ह्याचे लक्ष या लढतीकडे होते.

जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक कधी झाली ते जनतेला कळायचे नाही. परंतु यंदाची निवडणूक त्यास अपवाद ठरली. बँकेचे संचालकपद अबाधित ठेवणाऱ्या राजेंद्रअण्णा देशमुख यांच्याविरोधात तानाजी पाटील यांच्यात अटीतटीची लढत झाली. मतदानानंतर दोन्ही गटांनी विजयाचा दावा केला होता. आज मतमोजणी झाली. सोसायटी गटातील ६९ पैकी ४० मतदारांनी तानाजी पाटील यांना कौल दिला. तर राजेंद्रअण्णा देशमुख यांना केवळ २९ मतांवर समाधान मानावे लागले.

सकाळी ९.३० वाजता निकाल समजताच तानाजी पाटील समर्थकांनी आटपाडी शहरात गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी करत विजयोत्सव साजरा केला. जिल्हा परिषद निवडणुकीत मनिषा पाटील आणि पंचायत समिती निवडणुकीत तानाजी पाटील यांना पराभव पत्करावा लागला होता. जिल्हा बँक निवडणुकीत देशमुख यांचा करेक्ट कार्यक्रम करत पराभवाची परतफेड केली. तानाजी पाटील यांनी पहिल्याच प्रयत्नात बँकेत एंट्री केली.

हेही वाचलत का?

Back to top button