ऑस्ट्रेलिया संघाच्या खेळाडूंनी बुटातून दारु पिऊन विजय का साजरा केला? | पुढारी

ऑस्ट्रेलिया संघाच्या खेळाडूंनी बुटातून दारु पिऊन विजय का साजरा केला?

मुंबई : पुढारी ऑनलाईन

क्रिकेट विश्वाला टी २० चा नवा विजेता मिळाला. न्यूझीलंडला नमवून ऑस्ट्रेलिया संघाने पुन्हा एकदा आपण जगज्जेते असल्याचे दाखवून दिले. विश्वविजेतेपदाचा आनंद साजरा करण्यात देखिल ऑस्ट्रेलियन खेळाडू आघाडीवर असतात. सध्या ऑस्ट्रेलिया संघाच्या खेळाडूंचा एक अनोखा व्हिडिओ वायरल होत आहे. या व्हिडिओत सर्व खेळाडू बुटातून बिअर पिऊन आनंद साजरा करत आहेत. त्यामुळे सर्वांना एकच प्रश्न पडला आहे की, या खेळाडूंनी बुटातून दारु पिऊन विजय का साजरा केला?

मोठ्या सामन्यांमधील बॉस

टी २० वर्ल्डकप स्पर्धेच्या सुरुवातीपासून समीक्षक व क्रीडाप्रेमींना ऑस्ट्रेलिया यंदाचा वर्ल्डकपचा दावेदार असेल असे वाटले नव्हते. इतर संघांच्या तुलनेत ऑस्ट्रेलियाचा संघ जरी अनुभवी खेळाडूंचा असला तरी तो तुलनेने दुबळा वाटत होता. तसेच मागील काही काळातील ऑस्ट्रेलियाची कामगिरी देखिल चांगली होत नव्हती. पण, नेहमी महत्त्वांच्या क्षणी मोठ्या सामन्यांमध्ये आपणच बॉस असतो हे पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाने दाखवून दिले.

ऑस्ट्रेलियाने आयसीसी चॅम्पीयन ट्रॉफी दोनवेळा आणि एकदिवसी वर्ल्ड कप पाच वेळा जिंकला आहे. रविवारी टी२० वर्ल्डकप जिंकून त्यांनी आयसीसीचे आठ चषक आपल्या नावावर केले. अशी कामगिरी करणारा ऑस्ट्रेलिया हा एकमेव संघ आहे. मोठ्या स्पर्धा जिंकणे ही जणू ऑस्ट्रेलियाची सवयच आहे. एरवी बहरात नसणारे खेळाडू नेमके मोठ्या स्पर्धेत बहरात येतात व प्रतिस्पर्ध्यांवर हावी होत मातब्बर बनतात. अशीच कामगिरी यंदा देखिल ऑस्ट्रेलियाने केली आहे.

बुटातून दारु पिऊन साजरा केला विजय

जसे विश्वचषक जिंकणे ही ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची सवय तसेच अशा मोठ्या विजयांचा जल्लोषात आनंद साजरा करण्यात देखिल ते नेहमी आघाडीवर असतात. टी२० विश्व चषक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघातील सर्वच खेळाडूंनी आपल्या ड्रेसिंगरुम मध्ये मोठ्या प्रमाणार जल्लोष साजरा केला. यावेळी खेळाडूंनी चक्क बुटात बियर ओतून प्याले. यष्टीरक्षक मॅथ्यू वेड, अष्टपैलू खेळाडून मार्कस टॉयनिस तसेच मालिकावीर डेविड वॉर्नरने देखिल बुटात बियर ओतली आणि ती पिली. आयसीसीने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. सध्या हा व्हिडिओ समाजमाध्यमावर मोठ्या प्रमाणावर वायरल होत आहे. तसेच अनेक लोक यावर विविधप्रकारच्या कमेंट देखिल देत आहेत.

बुटातून दारु पिण्याची परंपरा

ऑस्ट्रेलिया मध्ये बुटात दारु ओतून पिण्याची अनोखी परंपरा आहे. आनंदामध्ये किंवा विजय साजरा करताना अनेक खेळाडू व लोक अशी कृती करतात. ऑस्ट्रेलियासह युरोपमधील अनेक भागात अशा पद्धतीने आनंद साजरा केला जातो. तसेच ही अत्यंत सामन्यबाब मानली जाते. या परंपरेला शुई (shoey) असे संबोधले जाते. अनेकवेळा लाईव्ह म्युझीक कॉन्सर्ट आणि खेळातील कार्यक्रमांमध्ये अशी कृती केली जाते. २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियाचा फॉर्म्युला वन स्टार खेळाडू डॅनियल रिकीयार्डो याने ‘ जर्मन ग्रँड प्रिक्स’ मध्ये बुटातून दारु पिऊन आनंद साजरा केला. यानंतर ही कृती अधीक प्रकाशात आली.

ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी बुटात ओतलेली दारु पिऊन विजय साजरा केला. त्यांनी ही परंपरा पुढे चालू ठेवली. तसेच त्यांचा हा व्हिडिओ सध्या भरपूर वायरल होत असल्याने या शुई (shoey) परंपरेची सर्वत्र चर्चा होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

Back to top button