येथील शाहूनगरात राहणार्या तरुणाच्या फेसबुक अकाऊंटवरील फोटोचा वापर करत अश्लिल व्हीडीओ बनवून ४५ हजार रुपये खंडणी उकळल्याचा प्रकार समोर आला. हा व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी देणार्या संशयित राहूल यादव नामक तरुणाविरोधात राजारामपुरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून संशयिताचा शोध सुरु आहे.
एका नामांकित कंपनीत काम करणार्या तरुणाला एका अनोळखी क्रमांकावरुन फोन आला. संशयिताने त्याला तुम्हाला फ्रेन्डशीपसाठी मुली हव्या आहेत का अशी विचारणा केली. याला फिर्यादी तरुणाने नकार दिल्यानंतर त्याला खाते हॅक करण्याची धमकी देत पैशाची मागणी करण्यात आली. यालाही त्याने प्रतिसाद दिला नव्हता. दरम्यान, संशयिताने फिर्यादी तरुणाच्या पत्नीच्या फेसबुकवरील काही फोटो मिळवले. या फोटोचा वापर करुन फिर्यादी तरुणाचा अश्लिल फोटो व व्हीडीओ क्लिप बनवून ती मोबाईलवर पाठवली. याबदल्यात वेळोवेळी ४५ हजार रुपये खंडणी उकळल्याचे फिर्यादीने पोलिसांना सांगितले. राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी सायबर पोलिसांच्या मदतीने संशयिताचा शोध सुरु केला आहे.