गुजरातमधील दहशतवाद विरोधी पथकाने ( Gujarat ATS ) धडक कारवाई करत तब्बल १२० किलो हेरॉईन जप्त केले. मोरबी जिल्ह्यात जप्त करण्यात आलेल्या या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत ६०० कोटी रुपये आहे, अशी माहिती गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली.
मोरबी जिल्ह्यात गुजरात एटीएसने केलेल्या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली आहे. मुख्तर हुसेन उर्फ जब्बार जोदिया, शमशुद्दीन हुसेन सय्यद आणि गुलाम हुसेन अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. प्राथमिक तपासामध्ये हा ड्रग्ज साठा पाकिस्तानमधून आल्याचे स्पष्ट झाले आहे. हा साठा पाकिस्तानी नागरिक झियाद बशीर बालोच याने पाठवला होता. याचा संबंध हा पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना जैश -ए-मोहम्मदशी असल्याचेही स्पष्ट झाले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मागील एकवर्षामध्ये गुजरात एटीएसकडून तब्बल १ हजार ३२० कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती गुजरात एटीएसचे प्रमुख हिमांशू शुक्ला यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महसूल गुप्तचर विभागाने (डीआरआय) सप्टेंबर महिन्यात कच्छ बंदरावर सुमारे २१ हजार कोटी रुपये किंमत असणारे तीन हजार किलाे हेरॉईन जप्त केले होते. जहाजावरील दोन कंटेनरमध्ये हा साठा होता. कागदपत्रांवर या कंटेनरमध्ये टाल्क पावडर असल्याचे दाखविण्यात आले होते. मात्र तपासणीवेळी तब्बल ३ हजार किलो हेरॉईन जप्त करण्यात आले. या कारवाईनंतर देशात विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले हाेते. याप्रकरणी दोन विदेश नागरिकांना अटक करण्यात आले होते.