Sangli News : विद्यार्थ्यांची गैरसोय झाली तर खपवून घेणार नाही : जयंत पाटील | पुढारी

Sangli News : विद्यार्थ्यांची गैरसोय झाली तर खपवून घेणार नाही : जयंत पाटील

तासगाव; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील मणेराजुरी, योगेवाडीसह अन्य गावातून विद्यार्थी तासगावला शिक्षणासाठी दररोज येत असतात. या विद्यार्थ्यांना वेळेवर बस मिळत नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. या विद्यार्थ्यांनी अनेकदा रास्ता रोको केला. परंतु त्याची दखल घेतली गेली नाही. यापुढील काळात विद्यार्थ्यांची गैरसोय झाली तर खपवून घेणार नाही, अशा शब्दांत आमदार जयंत पाटील यांनी विभागीय नियंत्रक सुनिल भोकरे यांना खडसावले. जिल्हा नियंत्रकांच्या कार्यालयामध्ये या संदर्भात एक बैठक झाली. यावेळी आमदार जयंत पाटील बोलत होते. तसेच आमदार सुमन पाटील यांच्याबद्दल अनुद्गार काढणाऱ्या कवठेमहांकाळ आगाराच्या व्यवस्थापक अश्विनी किरगत यांच्यावर कारवाई करा, असे निर्देशही यावेळी त्यांनी दिले.

मणेराजुरी, योगीवाडी भागातून शेकडो विद्यार्थी दररोज तासगावकडे येत असतात. तासगाव आणि कवठेमहांकाळ या दोन्हीही आगाराकडून विद्यार्थ्यांना वेळेवर बस सेवा उपलब्ध करून दिली जात नाही. याबद्दल आमदार पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी जिल्हा नियंत्रक सुनिल भोकरे यांनी गणपतीसाठी जिल्ह्यातून सुमारे २०० बसेस पाठवण्यात आल्या आहेत, असे सांगितले. त्यामुळे काही प्रमाणात गैरसोयी झाल्याचे मान्य केले. यापुढील काळामध्ये विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, अशी ग्वाही दिली.

कवठेमहांकाळ आगार व्यवस्थापकांचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवणार

कवठेमहांकाळ आगाराच्या व्यवस्थापक अश्विनी किरगत यांच्याबद्दल आमदार जयंत पाटील यांनी यावेळी तक्रार केली. सर्वच विद्यार्थ्यांची गैरसोय होत असताना जाब विचारल्यास त्या लोकप्रतिनिधींशी व्यवस्थित बोलत नाहीत. लोकप्रतिनिधींबद्दल सुध्दा उलट-सुलट अशी वक्तव्ये करतात. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली. परंतु आगार व्यवस्थापक कारवाईचे अधिकार माझ्याकडे नाहीत. ते वरिष्ठांकडे आहेत. याबाबत वरिष्ठ अधिका-यांकडे किरगत यांच्या विरोधातील तक्रारींचा अहवाल पाठवू, असे विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांनी सांगितले.

योगेवाडी – तासगाव नवीन बसेस सुरू करा : जयंत पाटील

मणेराजुरी, योगेवाडी येथील विद्यार्थ्यांना सद्यस्थितीतील बसेस अपुऱ्या पडत आहेत. कवठेमहांकाळ येथून येणाऱ्या बसेस भरून येतात, या विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी योगेवाडी ते तासगाव अशी महाविद्यालयीन नवीन बसेस वेळेत सुरू करा, अशी सूचना आमदार जयंत पाटील यांनी भोकरे यांना दिली. त्यांनी ती मान्य केली. लवकरच या मार्गावर नवीन बसेस सुरू करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. बैठकीला सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश पाटील, तासगाव बाजार समितीचे संचालक रामचंद्र उर्फ खंडू पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य सतीश पवार, माजी पंचायत समिती सभापती संजय पाटील उपस्थित होते.

हेही वाचा : 

Back to top button