Karnataka Bandh: कर्नाटक बंदला संमिश्र प्रतिसाद; बंगळूर विमानतळावरून ४० उड्डाणे रद्द | पुढारी

Karnataka Bandh: कर्नाटक बंदला संमिश्र प्रतिसाद; बंगळूर विमानतळावरून ४० उड्डाणे रद्द

पुढारी ऑनलाईन डेस्क : कावेरीचे पाणी तामिळनाडूला सोडल्याबद्दल कन्नड समर्थक आणि शेतकरी संघटनांनी आज (दि.२९) पुकारलेल्या कर्नाटक बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. बेंगळुरू, म्हैसूर आणि मंड्यासह राज्यातील अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले. राज्यातील बहुतांश दुकाने, व्यापारी प्रतिष्ठाने आणि भोजनालये बंद ठेवण्यात आली. (Karnataka Bandh)

बंगळूर विमानतळावरून ४० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. बेकायदेशीर कर्नाटक बंदला २ हजारहून अधिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. प्रशासनाने शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. (Karnataka Bandh)

सुमारे ५० कन्नड समर्थक कार्यकर्त्यांनी केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वारावर जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आणखी पाच आंदोलकांना विमानतळाच्या आत तिकीट काउंटरवर घोषणाबाजी करताना ताब्यात घेण्यात आले. विधानसौधा, टाऊन हॉल, फ्रीडम पार्क, रेल्वे स्टेशन, केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ यांसारख्या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

विजयनगर जिल्ह्यात बंदचा कोणताही परिणाम नाही

कर्नाटक बंदला विजयनगर जिल्ह्यात थंड प्रतिसाद मिळाला. बस, ऑटो आणि कॅबची वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू होती. मात्र, होसापेठे केकेआरटीसी बसस्थानकात प्रवाशांच्या संख्येत किंचित घट दिसून आली. इतर ठिकाणी हॉटेल आणि दुकाने सुरू होती आणि वाहतूक सुरळीत होती.

Karnataka Bandh : कर्नाटक बंदला बल्लारीमध्ये थंड प्रतिसाद

बल्लारीमध्ये कर्नाटक बंदचा कोणताही परिणाम दिसून आला नाही. महामार्गावर टायर जाळून प्रतिकात्मक आंदोलन करणाऱ्या कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी सोडून दिल्यानंतर वाहतूक पूर्वपदावर आली. दरम्यान, कलबुर्गीमध्ये बंदचा कोणताही परिणाम दिसून आला नाही, सर्व दुकाने आणि व्यवसाय नेहमीप्रमाणे सुरू होते.

हेही वाचा 

Back to top button