Pakistan | पाकिस्तानात आत्मघाती बॉम्बस्फोट, पोलिस अधिकाऱ्यासह ५२ ठार, ५० जखमी | पुढारी

Pakistan | पाकिस्तानात आत्मघाती बॉम्बस्फोट, पोलिस अधिकाऱ्यासह ५२ ठार, ५० जखमी

पुढारी ऑनलाईन : पाकिस्तानमधील (Pakistan) बलुचिस्तानच्या मस्तुंग येथे आज शुक्रवारी मशिदीजवळ झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात किमान ५२ जण ठार झाले, तर सुमारे ५० जण जखमी झाले आहेत. याबाबतचे वृत्त पाकिस्तानमधील dawn ने दिले आहे. या वृत्तानुसार, “बलुचिस्तानच्या मस्तुंग येथे झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात किमान ५२ जण ठार झाले, तर ५० जण जखमी झाले. मृतांमध्ये एका पोलिस अधिकाऱ्याचा समावेश आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त लोक जमत असलेल्या मशिदीजवळ हा स्फोट झाला.”

संबंधित बातम्या 

शहीद नवाब घोस बख्श रायसानी मेमोरियल हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सईद मिरवानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत २८ मृतदेह रुग्णालयात आणण्यात आले आहेत, तर २२ मृतदेह मस्तुंग जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या

उपमहानिरीक्षक (डीआयजी) मुनीर अहमद यांनी रॉयटर्सशी बोलताना सांगितले की, “आत्मघाती बॉम्बरने पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) यांच्या वाहनाजवळ स्फोट घडवून आणला.” हा स्फोट एका मशिदीजवळ झाला जिथे लोक ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्तच्या मिरवणुकीसाठी जमले होते.

स्टेशन हाऊस ऑफिसर (एसएचओ) जावेद लेहरी यांनी सांगितले की, जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले जात आहे तर रुग्णालयांमध्ये आपत्कालीन परिस्थिती लागू करण्यात आहे.

मस्तुंगचे साहाय्यक आयुक्त अत्ता उल मुनीम यांनी सांगितले की, या स्फोटाची तीव्रता मोठी आहे. मदिना मशिदीजवळ हा स्फोट झाला. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मस्तुंगचे पोलिस उपअधीक्षक (डीएसपी) नवाज गशकोरी यांचा मृतांमध्ये समावेश आहे.

प्रांतीय काळजीवाहू माहिती मंत्री जान अचकझाई यांनी सांगितले की, स्फोटात गंभीर जखमी झालेल्यांना क्वेटा येथे हलवण्यात आले असून शहरातील सर्व रुग्णालयांमध्ये आपत्कालीन स्थिती लागू करण्यात आली आहे.

अचकझाई पुढे म्हणाले की, गरज भासल्यास गंभीर जखमींना तात्काळ कराचीला हलवण्याची व्यवस्था करण्यात यावी. आरोग्य विभागाच्या वतीने कराचीतील रुग्णालयांशी संपर्क साधला जात आहे, असेही ते म्हणाले.

क्वेट्टाच्या जिल्हा प्रशासनाने सांगितले की, स्फोटातील ३० हून अधिक जखमींना शहीद नवाब घोस बख्श रायसानी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.

“या घटनेतील जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर आहे,” असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मस्तुंगमध्ये दहशत निर्माण करणारा गेल्या १५ दिवसांतील हा दुसरा मोठा स्फोट आहे. याआधी १४ सप्टेंबर रोजी झालेल्या स्फोटात जमियत उलेमा-ए-इस्लाम फज्ल (JUI-F) नेते हाफिज हमदुल्ला आणि इतर अनेक जण जखमी झाले होते. (Pakistan)

सिंधचे अंतरिम मुख्यमंत्री मकबूल बाकार यांनी या स्फोटाच्या घटनेचा निषेध केला आहे, असे त्यांच्या प्रवक्त्याने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. निष्पाप लोकांचे प्राण घेणारे हे मानवतेचे शत्रू आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी निवेदनात म्हटले आहे.

हे ही वाचा :

Back to top button