सांगली : रिक्षावाला खड्डे मुजवू लागला अन् आली महानगरपालिकेला जाग | पुढारी

सांगली : रिक्षावाला खड्डे मुजवू लागला अन् आली महानगरपालिकेला जाग

सांगली/कुपवाड; पुढारी वृत्तसेवा : येथील विजयनगर-कुपवाड रस्त्यावर रस्त्यात ठिक-ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे मुजवण्यासाठी नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही खड्डे मुजवले नाहीत. त्यामुळे या परिसरात राहणारे रिक्षाचालक प्रकाश काळगे यांनी त्यांच्या रिक्षातून खड्डे मुजवण्यास सुरुवात केली. ही बाब महापालिका प्रशासनाला लक्षात आल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. त्यानंतर प्रशासनाने खड्डे मुजण्याचे काम सुरू केले.

विजयनगर येथे मध्यवर्ती शासकीय कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, न्यायालय या इमारती झाल्यामुळे हा परिसर महापालिका क्षेत्राचा मध्यवर्ती भाग आहे. तासगाव, विटा, आटपाडी, पलूस या भागातील अनेकजण कुपवाड-विजयनगर या रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक वाढत आहे. हा रस्ता करण्यासाठी आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च केले. मात्र ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे मुजवण्यासाठी परिसरातील नागरिकांनी महापालिका लोकप्रतिनिधी, प्रशासन यांच्याकडे वारंवार मागणी केली. त्याची दखल घेतली गेली नाही. या खड्ड्यामुळे अनेक अपघात झाले. त्यात काही जखमी झाले. अखेर रिक्षाचालक काळगे यांनी रिक्षात खडी भरून खड्डे मुजवण्यास सुरुवात केली. तो व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला आणि मनपा जागी झाली. याबाबत सामाजिक कार्यकर्ते सतीश साखळकर म्हणाले, महापालिका क्षेत्रात चार वर्षापासून पॅचवर्क कामावर किती कोटी रुपये खर्च करण्यात आले. त्याचे स्पेशल ऑडिट केले पाहिजे. त्यातून खूप भानगडी उघड होतील.

कंत्राटदाराच्या कामाकडे हेतूपूर्वक दुर्लक्ष?

विजयनगर रस्त्यावर चाणक्य चौक ते कुपवाड या मार्गावर काही दिवसांपूर्वी महापालिकेने विद्युत खांब बसवले. त्यासाठी रस्त्यामध्ये मोठ्या चरी पडल्या. त्या ठिकाणी मोठे खड्डे पडलेत. अनेक कंत्राटदार या भागातील काही नगरसेवकांच्या मर्जीतील आहेत. त्यांच्या निकृष्ट कामाकडे त्यांचे हेतूपूर्वक दुर्लक्ष असते. संबंधित कंत्राटदारावर कारवाई करा, अशी मागणी होत आहे.

Back to top button