सांगली : अनैतिक संबंधांत अडसर ठरला पोटचा गोळा, प्रियकराच्या मदतीने आईनेच संपवले | पुढारी

सांगली : अनैतिक संबंधांत अडसर ठरला पोटचा गोळा, प्रियकराच्या मदतीने आईनेच संपवले

विटा (सांगली) : पुढारी वृत्तसेवा- मुलाच्या अपहरणाचा बनाव करून अनैतिक संबंधांत अडसर नको म्हणून प्रियकराच्या मदतीने सहा वर्षाच्या पोटच्या गोळ्याला आईनेच संपवले. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना सांगली जिल्ह्यातील लेंगरे (ता. खानापूर) येथे घडली आहे. या प्रकरणी संशयित महिला ज्योती प्रकाश लोंढे (वय २८, रा. लेंगरे) आणि तिचा प्रियकर रुपेश नामदेव घाडगे (वय २५, रा .जोंधळखिंडी) या दोघांनाही विटा पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,लेंगरे येथील ज्योती लोंढे या विवाहितेचे जोंधळखिंडी येथील रुपेश घाडगे याच्याशी प्रेम संबंध जुळले होते. ज्योती आणि रुपेश घाडगे यांना लग्न करायचे होते. परंतु, ज्योतीचा सहा वर्षीय मुलगा शौर्य प्रकाश लोंढे याच्यामुळे या दोघांना अडचण होत होती. त्यामुळे या दोघांनी आपली अडचण दूर करण्यासाठी कारस्थान रचून शौर्य लोंढे याचा अपहरण झाल्याचा बनाव केला.

शनिवार, ६ मे च्या दुपारपासून लेंगरे गावातील शौर्य लोंढे हा सहा वर्षाचा चिमुकला मुलगा हरवला आहे, असा मेसेज त्याच्या फोटोसह सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.विशेष म्हणजे त्याच दिवशी आपला मुलगा शौर्य याचे लेंगरे येथून अपहरण झाल्याची फिर्याद विटा पोलीस ठाण्यात संशयित ज्योती लोंढे हिने दिली होती. त्यानंतर विटा पोलिसांच्या पथकाने तातडीने तपास यंत्रणा राबवत स्थानिक चौकशी सुरू केली.

लेंगरे गावात शनिवारपासून विट्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली चौकी हवालदार अमोल पाटील, सोमनाथ कोळी यांच्यासह पोलीस पथक ठाण मांडून होते. दरम्यानच्या काळात संशयित ज्योती ही पोलिसांकडे आपल्या मुलाच्या तपासाबाबत वारंवार विचारणा करत होती. त्यावरून संशय आल्याने विटा पोलिसांनी ज्योतीच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स पाहिल्यानंतर त्यांना रुपेशवर संशय आला. पोलिसांनी रुपेशला तात्काळ ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारणा केले असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

परंतु पोलिसांनी आपला खाक्या दाखविल्यानंतर त्यानेच शौर्य लोंढे यास खाऊचे आमिष दाखवून त्यास गाडीवर बसवून लेंगरे पासून काही अंतरावर असलेल्या शफी पिरजादे यांच्या विहिरीत जवळ गाडी नेली आणि अत्यंत क्रूरपणे त्याला त्या विहिरीत ढकलून दिल्याचे तपासात उघडकीस आले. दरम्यान या प्रकरणी संबंधित दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

Back to top button