पुणे : परतवारीच सुरू! नव्या संगीत नाट्याची निर्मिती होईना! | पुढारी

पुणे : परतवारीच सुरू! नव्या संगीत नाट्याची निर्मिती होईना!

सुवर्णा चव्हाण

पुणे : गेल्या दहा वर्षांत संगीत रंगभूमीवर नवीन नाटकांची निर्मिती फारशी झालेली नाही आणि आताही तेच चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे ‘संगीत संशयकल्लोळ’पासून ते ‘संगीत मानापमान’पर्यंतच्या जुन्या नाटकांचे प्रयोगच रंगभूमीवर होत आहेत. व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी संगीत नाटकांच्या प्रयोगांची परतवारीच सुरू असल्याचे दिसत आहे.

प्रेक्षकवर्ग ठिकठिकाणी विखुरला गेल्यामुळे आर्थकि निधीची कमतरता, तरुण कलाकारांची मेहनत घेण्याची तयारी नसणे, संगीत नाटकांत झटपट प्रसिद्धी न मिळणे आणि दर्जेदार नाट्यलेखनाचा अभाव, अशा विविध कारणांमुळे सध्या नवीन नाट्यनिर्मिती थांबली आहे. त्यामुळे सध्यातरी नव्या संगीत नाटकांपासून रंगभूमी वंचित आहे.

नाट्य संस्थांकडून संगीत नाटकांचे महिन्याला फक्त तीन ते चार प्रयोग होत आहेत. त्यात जुन्याच नाटकांची संख्या जास्त आहे. अण्णासाहेब किर्लोस्कर, गोविंद बल्लाळ देवल आणि कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्यासारख्या दिग्गजांच्या संगीत नाटकांनी रंगभूमीचा सुवर्णकाळ गाजवला. आजही त्यांच्याच नाटकांचे प्रयोग होताना दिसत आहे. नवीन नाटक करणे आताच्या घडीला आर्थकिदृष्ट्या परवडणारे नसल्याचे रंगकर्मीनी सांगितले.

शेवटचे संगीत नाटक ‘नि:शब्द माजघरात’

ज्येष्ठ रंगकर्मी रवींद्र खरे म्हणाले की, सध्या प्रेक्षकवर्ग विखुरला आहे. तरुण कलाकारांची मेहनत घ्यायची तयारी नाही, त्यांच्या जवळ तेवढा वेळही नाही, सध्या झटपट प्रसिद्धी प्रत्येकाला हवी आहे. पण, ती संगीत नाटकांनी मिळत नाही. त्यामुळे तरुण पिढीचा कल संगीत नाटकांकडे फारसा नाही. दर्जेदार नाट्यलेखनाचा अभाव आहे. रेकॉर्डेड संगीत म्हणजेच संगीत नाटक, असे नाही.

संगीत रंगभूमीवर संगीत नाटकांचे योग्य परीक्षण करणारे लोकही नाहीत. या विविध कारणांमुळे नवीन नाट्यनिर्मिती होताना दिसत नाही. राज्य नाट्य स्पर्धांपुरते काही संगीत नाटक येतात. पण, त्याचे प्रयोग प्रत्यक्ष रंगभूमीवर होत नाहीत. मी शेवटचे संगीत नाटक ‘नि:शब्द माजघरात’ हे केले होते; ज्याला दिल्लीच्या नाट्य स्पर्धेत सर्व विभागांत पारितोषिके मिळाली होती. पण, आता नवीन नाटक करण्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही.

संगीत नाटकासाठीच्या प्रयोगांमागे लागणारा खर्च आता वाढला आहे. कारण, कलाकारांची मानधनापासून ते रंगभूषेपर्यंतचा खर्चही वाढला असून, ते निर्मात्यांना परवडणारे नाही. म्हणूनच, संगीत नाटकांचे प्रयोगही कमी झाले आहेत. जुन्या नाटकांचे प्रयोग काही प्रमाणात होत असले, तरी त्यांची संख्याही फारशी नाही. तर संगीत रंगभूमीवर नवीन नाटक येणे तर आताच्या घडीला अशक्य आहे. कारण, नवीन नाटक आता लिहिले जात नाही.

                               – भाग्यश्री देसाई, अभिनेत्री आणि निर्मात्या

Back to top button