पाथर्डी तालुका : बियाण्यांबाबत गैरप्रकार टाळावेत : आमदार मोनिका राजळे | पुढारी

पाथर्डी तालुका : बियाण्यांबाबत गैरप्रकार टाळावेत : आमदार मोनिका राजळे

पाथर्डी तालुका(नगर); पुढारी वृत्तसेवा : एखाद्या कंपनीच्या बियाण्याची मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी होऊन, त्याला बाजारात मागणी वाढते. परिणामी त्याचा तुटवडा निर्माण होतो. ते बियाणे शेतकर्‍यांना मिळत नाही. त्या काळात अनेक गैरप्रकार निदर्शनास येतात. असे गैरप्रकार टाळण्यासाठी अधिकार्‍यांनी काळजी घ्यावी, अशा सूचना आमदार मोनिका राजळे यांनी दिल्या.

कृषी विभागातर्फे पाथर्डी तालुका खरीपपूर्व हंगाम नियोजन बैठक पाथर्डी येथील पंचायत समितीच्या सभागृहात आमदार राजळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस उपविभागीय कृषि अधिकारी पोपटराव नवले, तहसीलदार शाम वाडकर, गटविकाधिकारी डॉ.जगदीश पालवे, तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे, फर्टिलायझर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सतीश मुनोत, तालुकाध्यक्ष दिलिप रोकडे, राहुल कारखेले, जयदीप गोसावी, अतुल बंकर, पंचायत समितीचे कृषि अधिकारी गौतम फाजगे आदी उपस्थित होते.

कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत लाभार्थ्यांना ट्रॅक्टर, अवजारांचे वाटप आमदार राजळे यांच्या हस्ते करण्यात आले. पीक स्पर्धा योजनेत बाबुराव लक्ष्मण धनगर (घुमटवाडी), जालिंदर गडाख (चिराळ), अशोक टेमकर (भोसे) यांनी बाजारी, तर विक्रम अकोलकर (करंजी), हनुमंत घोरपडे ( चिराळ), अर्जुन भिटे (करंजी) यांनी तूर पिकांत विक्रमी उत्पादन घेतले. त्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. काही शेतकर्‍यांनी जिल्हा आणि राज्य पातळीवर पिकातील उत्पन्नाबाबत क्रमांक पटकावला आहे.

नुकसान भरपाई अनुदान लवकरच

गारपीट, वादळी वारा यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. प्रलंबित अनुदान लवकरच शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग केले जाईल. या वर्षातील नुकसान भरपाई त्वरित देण्याची कार्यवाही सुरू आहे. शासनाने एक रुपयात पीक विमा योजना सुरू केली असून, त्याचा लाभ घेण्याचे आवाहन आमदार राजळे यांनी केले.

Back to top button