डोंबिवली : फुस लावून पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीची पोलिसांनी केली सुटका | पुढारी

डोंबिवली : फुस लावून पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीची पोलिसांनी केली सुटका

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली मधील अल्पवयीन मुलीवर अत्याचारांची घटना ताजी असतानाच इंस्टाग्रामच्या माध्यमातून जवळीक साधत एका १३ वर्षीय मुलीला फुस लावून पळवून नेल्याची घटना घडली होती. या प्रकरणात पोलिसांनी संबंधित तरुणावर कारवाई केली आहे. दरम्यान, पोलिसांनी या मुलीला तिच्या पालकांच्या ताब्यात सुखरूप दिले आहे. पोलिसांना सुरुवातीला या मुलाची आणि अल्पवयीन मुलीची कोणतीच माहिती मिळत नव्हती. मात्र पोलिसांनी मोठ्या कौशल्याने या मुलीची माग काढत तिची सुखरूप सुटका केली.

अक्षय तुकाराम महाडिक (२१ ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून कल्याण कोर्टाने त्याला अधिक चौकशीकरिता पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सोमवारी २० सप्टेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास डोंबिवली मधील विष्णूनगर पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३६३, ३५४ आणि लैंगिक अत्याचारांपासून बालकांचे संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

एका १३ वर्षीय मुलीला फूस लावून तिच्या पालकांच्या रखवालीतून पळवून नेल्याचा गुन्हा दाखल होताच डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त जय मोरे, वपोनि पंढरीनाथ भालेराव, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोनि मोहन खंदारे यांनी मुलीचा शोध घेण्याचे आदेश दिले. या तपासाची जबाबदारी सपोनि गणेश वडणे यांच्या नेतृत्वाखाली फौजदार घनश्याम बेंद्रे, तुळशीराम लोखंडे आणि सचिन कांगुणे यांच्याकडे सोपवण्यात आली.

अवघ्या ४ जणांच्या पथकाने पथकाने मुलीबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नसताना तांत्रिक विश्लेषणासह खासगी गुप्तहेरांच्या साह्याने अक्षय महाडिक याला ठाण्यातून उचलले. चौकशीदरम्यान त्याने या मुलीला भिवंडीतील एका घरात कोंडून ठेवल्याची माहिती दिली. पोलिसांनी भिवंडीतील काल्हेर गावातल्या तेजस्विनी आर्केड इमारतीतल्या आरोपीच्या फ्लॅटमध्ये कोंडलेल्या मुलीला ताब्यात घेतले. त्यानंतर या मुलीला तिच्या पालकांच्या हवाली करण्यात आल्याचे वपोनि पंढरीनाथ भालेराव यांनी सांगितले.

आरोपीने 13 वर्षीय तक्रारदार मुलीशी इंस्टाग्रामवरुन ओळख वाढवली होती. त्यातून या मुलीशी जवळीक साधल्यानंतर आरोपीने तिला फूस लावून पळवून नेले. आरोपी अक्षय महाडिक हा सीसीटीव्ही सिस्टीम, कॉम्प्युटरमध्ये एक्सपर्ट असल्याने तो सोशल मिडियामाध्यमांमध्येही तरबेज आहे. त्यामुळेच त्याने इंस्टाग्रामच्या माध्यमातून मुलीशी जवळीक साधली होती, असे वपोनि पंढरीनाथ भालेराव यांनी पुढारीशी बोलताना सांगितले.

हेही वाचले का?

Back to top button