सांगली : मिरज रेल्वे स्थानकाजवळील कॉर्डलाईनचा वापर केवळ मालवाहतुकीसाठीच | पुढारी

सांगली : मिरज रेल्वे स्थानकाजवळील कॉर्डलाईनचा वापर केवळ मालवाहतुकीसाठीच

मिरज; पुढारी वृत्तसेवा : मिरज रेल्वे स्थानकाजवळ कॉर्डलाईन होणार असून याचा प्रवासी वाहतुकीवर परिणाम होणार आहे. तसेच प्रवासी गाड्या मिरज जंक्शनवर न येता परस्पर बाहेरून जातील, अशा चर्चा सुरू होत्या. परंतु कॉर्डलाइन फक्त मालवाहतुकीसाठी वापरली जाईल, असे सांगून या चर्चांना पुणे मंडल रेल प्रबंधक इंदुराणी दुबे यांनी पूर्णविराम दिला.

मध्य रेल्वे पुणे विभागीय रेल प्रबंधक इंदुराणी दुबे या मिरज, सांगली, हातकलंगले व कोल्हापूर स्थानकाच्या पाहणी दौर्‍यावर आल्या होत्या. यावेळी रेल्वे कृती समिती अध्यक्ष व पश्चिम महाराष्ट्र भाजप संघटन मंत्री मकरंद देशपांडे, सचिव सुकुमार पाटील यांच्यासह विविध संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी त्यांची कॉर्डलाईन संदर्भात भेट घेतली. यावेळी दुबे यांनी प्रस्तावित कॉर्डलाईनचा वापर हा प्रामुख्याने मालवाहतूक गाड्यांसाठी करण्यात येणार आहे. या कॉर्डलाईनचे स्थानक मिरज जंक्शन परिसरामध्येच उभारण्यात येईल. मिरज जंक्शन येथूनच कॉर्डलाईन स्थानकास फूट ओवरब्रीज व रोडने जोडण्यात येईल. यामुळे प्रवाशांना सुध्दा सोईचे होईल. त्याचबरोबर मिरज स्टेशनवरील मिरज जंक्शन दर्शक साईन बोर्डही येत्या तीन-चार दिवसांमध्ये बसवला जाईल. स्टेशन बाहेरील रस्ता व पाण्याचा निचरा करणारे ड्रेनेज व गटारीचे कामे लवकरात लवकर तातडीने पूर्ण करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

कॉर्डलाईनमुळे धामणी येथे जंक्शन उभा करण्यात येणार आहे. त्यामुळे कोल्हापूर, बेळगाव आणि पंढरपूर मार्गावर धावणार्‍या गाड्या या कॉर्डलाईनवरून धावतील, अशी चर्चा होती. परंतु कॉर्डनलाईन वरून फक्त मालवाहतुकीच्या गाड्या धावणार आहेत. प्रवासी गाड्या मिरज जंक्शनमधून सुटणार आहेत. त्यामुळे कॉर्डलाईनवरून सुरू असणार्‍या चर्चेला पुणे मंडल रेल प्रबंधक दुबे यांनी पूर्णविराम दिला.

दरम्यान, दुबे यांनी सांगली, मिरज, हातकणंगले आणि कोल्हापूर या स्थानकांची पाहणी केली. स्थानकादरम्यान सर्व विभागांना भेट देऊन प्रलंबित कामांचा तातडीने निपटारा करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी अधिकार्‍यांना दिल्या.

अधिक वाचा :

Back to top button