सांगली : कारवर दरोडा; दोन लाखांचा ऐवज लुटला | पुढारी

सांगली : कारवर दरोडा; दोन लाखांचा ऐवज लुटला

नागज; पुढारी वृत्तसेवा : पंढरपूरला निघालेली कार अडवून, चाकूचा धाक दाखवून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह एक लाख 91 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. चोरट्यांबरोबर झालेल्या झटापटीत कारमधील माधवी जनार्दन जानकर (वय 25, रा. घाडगे कॉलनी कोल्हापूर) व विकास परशुराम हेगडे (वय 22, रा. कलेक्टर ऑफिस शेजारी कोल्हापूर) हे जखमी झाले. ही घटना रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची गावच्या हद्दीत आगळगाव फाट्याजवळ घडली.

याबाबतची माहिती अशी, व्यवसायाने वकील असणार्‍या भाग्यश्री विलास पाटील (वय 28, रा. सरनोबतवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यांच्यासह सहाजण कार (एम.एच.04, इ.टी. 8037) ने कोल्हापूरहून पंढरपूरला निघाले होते. दरम्यान, गुरुवारी रात्री आगळगाव फाट्याजवळ पाटील यांच्या गाडीवर अज्ञातांनी दगडफेक केली. त्यांनी गाडी रस्त्याच्या बाजूला थांबवली असता पाच अज्ञात चोरटे गाडीजवळ आले.

पाटील यांना चाकूचा धाक दाखवत व जीवे मारण्याची धमकी देत गाडीतील रोख रक्कम व महिलांच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने काढून घेतले. गाडीतील तीन मोबाईल, स्मार्टवॉच महिलांच्या अंगावरील तीन तोळे सोन्याचे दागिने, 51 हजार 700 रुपयांची रोख रक्कम असे सुमारे दोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.

गाडीतील पर्स, त्यातील ए.टी.एम. कार्ड, पॅन कार्ड, ड्राइविंग लायसन्स व वकिलाची अन्य कागदपत्रे चोरट्यांनी पळवली. गाडीवर दगडफेक केल्याने नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात झाली आहे.

एस.टी. वर दगडफे क, मंगळवेढ्याची मुलगी जखमी

दरम्यान, याच अज्ञात चोरट्यांनी मालवणहून मंगळवेढ्याला निघालेल्या सहलीच्या एस.टी. बस ( एम. एच.14, बी. टी.3590) वरही दगडफेक केली. या घटनेत प्रगती दत्तू नवत्रे (वय 13, रा. मंगळवेढा ) ही शाळकरी मुलगी जखमी झाली. बसमधील चालक व शिक्षकांनी प्रसंगावधान राखून गाडी न थांबवता भरधाव वेगाने नेऊन जखमी मुलगीला सांगोला येथे दवाखान्यात दाखल केले. कवठेमहांकाळ एस. टी. आगाराचे आगार व्यवस्थापक महेश जाधव यांनी याबाबत कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Back to top button