सांगली : मिरज येथील स्टेट बँक शाखेतून मृत व्यक्तीच्या खात्यावरील २१ लाख रुपये हडपले | पुढारी

सांगली : मिरज येथील स्टेट बँक शाखेतून मृत व्यक्तीच्या खात्यावरील २१ लाख रुपये हडपले

मिरज; पुढारी वृत्तसेवा : मिरज – पंढरपूर रस्त्यावरील स्टेट बँक शाखेतील मृत खातेदाराच्या खात्यातील 21 लाख 28 हजार 364 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन व्यवस्थापक अनिल साळे व त्याचा सहायक अवधूत पाटील अशा दोघांवर महात्मा गांधी चौकी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सध्याचे बँक व्यवस्थापक मयूर चंद्रशेखर यळमळ्ळी यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात उभे केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, स्टेट बँकेच्या शाखेत रघुवीरकुमार रतन राव हे खातेदार होते. ते 11 मार्च 2018 रोजी मृत झाले. त्यावेळी त्यांच्या एकूण तीन खात्यांमध्ये 21 लाख 28 हजार 364 रुपयांची रक्कम होती. दरम्यान, तत्कालीन व्यवस्थापक साळे आणि त्याचा सहाय्यक कर्मचारी पाटील या दोघांनी आपल्या पदाचा गैरवापर करून सदर मृत खातेदाराच्या बँक रकमेवरच डल्ला मारला. साळे याच्या अधिकाराखाली पाटील याने मृत राव यांच्या बँक खात्यात शिल्लक असलेली सर्व रक्कम इतर खात्यांवर वर्ग केली, असे तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, गुन्हा दाखल होताच महात्मा गांधी चौक पोलिसांनी अनिल साळे व अवधूत पाटील या दोघांना अटक केली आहे.

अधिक वाचा :

Back to top button