सांगली : पलूस तालुक्‍यात काँग्रेसला आत्मचिंतनाची गरज; आगामी निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादीची अग्नीपरीक्षा | पुढारी

सांगली : पलूस तालुक्‍यात काँग्रेसला आत्मचिंतनाची गरज; आगामी निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादीची अग्नीपरीक्षा

पलूस / तुकाराम धायगुडे : पलूस तालुक्यात १५ ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेसचे ११३ सदस्य व ९ ठिकाणी सरपंच विराजमान झाले. परंतु काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपचे ३५ सदस्य व ३ ग्रामपंचायतींवर सरपंच तर राष्ट्रवादीचे १९ सदस्य व एका ग्रामपंचायतीवर सरपंच विराजमान झाल्याने काँग्रेसला आत्मचिंतनाची गरज आहे. तर आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपला अग्नीपरीक्षा द्यावी लागणार आहे.

पुनदी तर्फ वाळवा या ग्रामपंचायतीत गत निवडणुकीत सरपंच पदासह काँग्रेसने सात जागा जिंकत सत्ता काबीज केली होती. तर राष्ट्रवादीला केवळ तीन जागा मिळाल्या होत्या. या वेळी काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजप अशी तिरंगी लढत झाली. काँग्रेसने सर्वच्या सर्व १० जागा जिंकल्या. राष्ट्रवादी व भाजपाला एकही सदस्य पदाची उमेदवारी जिंकता आली नाही; परंतु सरपंचपदाचे उमेदवार आश्विनी पाटील यांचा एक मताने झालेला पराभव संपत पाटील, प्रमोद जाधव, पृथ्वीराज पाटील सहित काँग्रेसच्या जिव्हारी लागला. याठिकाणी पुनम दीपक पाटील या भाजपच्या नूतन सरपंच म्हणून विरजमान झाल्या आहेत.

बुर्ली ग्रामपंचायत भाजप-काँग्रेस वि. राष्ट्रवादी अशी निवडणूक झाली. येथे काँग्रेसने ८ जागा जिंकत सरपंचपदाच्‍या उमेदवार दीपाली प्रमोद काळे यांचा ६७९ मतांनी दणदणीत विजय झाला. तर भाजपाला ४ जागा मिळाल्या. राष्ट्रवादीला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. त्यामुळे ग्रामपंचायतीवर काँग्रेस-भाजपा युतीची सत्ता आली. माजी जि.प. सदस्य हेमंत पाटील यांच्या अनुपस्थितीत ही निवडणूक झाली. भाजपचे प्रमोद मिठारी, काँग्रेसचे संतोष पाटील, अनिल जाधव, तुकाराम पाटील, अण्णासो मुंजावर तर राष्ट्रवादीचे सतीश चौगुले, राजाराम पाटील, नागेश पाटील, निवृत्ती पाटील यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती.

वसगडे ग्रामपंचायतीच्या गतनिवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस गट, शेतकरी संघटना असे युवा परिवर्तन पॅनेल विरुद्ध काँग्रेस निवडणूक झाली होती. ८ जागा व सरपंचपदाची जागा जिंकत युवा परिवर्तन पॅनलची सत्ता आली होती. आता माजी पंचायत समिती सदस्य अमोल पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने सरपंचपदासहित ११ जागा जिंकल्या. नूतन सरपंच वृशाली काशीद यांचा ४८१ मतांनी विजय झाला. तर भाजपला ३ जागा मिळाल्या.

खटाव ग्रामपंचायत गतनिवडणुकीत काँग्रेसने सरपंच पदासहित ७ जागा जिंकत सत्ता काबीज केली होती. तर राष्ट्रवादी भाजपा युतीला केवळ दोन जागा मिळाल्या होत्या. आता काँग्रेसने ५ जागांसहित नूतन सरपंच ओंकार पाटील यांनी १०६ मतांनी विजय मिळविला. भाजपाला ३ जागा व राष्ट्रवादीला एका जागेवर समाधान मानावे लागले. काँग्रेस विरुद्ध भाजप-राष्ट्रवादी अशी निवडणूक झाली. काँग्रेसचे शशिकांत पाटील, राष्ट्रवादीचे प्रभाकर साळवी व भाजपचे विश्वजीत पाटील यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती.

बांबवडे ग्रामपंचायत गतनिवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता होती. काँग्रेसने सरपंच पदासह सात जागा, राष्ट्रवादीला पाच, भाजपला तीन जागा मिळाल्या होत्या. आता काँग्रेस-राष्ट्रवादी-भाजप अशी तिरंगी लढत झाली. काँग्रेसचे ९ सदस्य तर राष्ट्रवादीचे ६ सदस्य निवडून आले. येथे राष्ट्रवादीचे अरविंद मदने यांचा ७९ मतांनी विजय झाला. सत्ता काँग्रेसची व सरपंच राष्ट्रवादीचा असे समीकरण तयार झाले. काँग्रेसचे विश्वास पाटील, ए.डी पाटील, पी.सी पाटील, राष्ट्रवादीचे पोपट संकपाळ, पांडुरंग संकपाळ तर भाजपचे जयभवानी उद्योग समूहाचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती.

सांडगेवाडी ग्रामपंचायत गत निवडणुकीत काँग्रेसचे शरद सांडगे गटाची सत्ता होती. सरपंच पदासहित ८ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसच्या पांडुरंग सूर्यवंशी गटाला ३, राष्ट्रवादीच्या गोरख सूर्यवंशी यांना १ जागा मिळाली होती. आता पांडुरंग सूर्यवंशी गटाला ८ जागा व सरपंच उमेदवार अमर वडार यांचा ४५ मतांनी विजय झाला. तर शरद सांडगे गटाला केवळ ३ जागेवर समाधान मानावे लागले. ओबीसी आरक्षण असताना देखील शरद सांडगे यांनी स्वतःच्या घरात सरपंच उमेदवारी घेतल्याने पराभवाला सामोरे जावे लागल्याची चर्चा गावात सुरु होती.

अंकलखोप ग्रामपंचायत गतनिवडणुकीत काँग्रेसने सरपंच पदासहित १२ जागा जिंकल्या होत्या. तर भाजपाला ५ जागा मिळाल्या होत्या. आता भाजप-राष्ट्रवादी वि. काँग्रेस अशी निवडणूक झाली. काँग्रेसने १२ जागा जिंकत सत्ता काबीज केली. परंतु सरपंचपदी भाजपचे राजेश्वरी सावंत यांचा ८८० मतांनी विजय झाला. भाजपाला १ जागा, राष्ट्रवाडीला ४ जागा मिळाल्या. काँग्रेसचे उदय पाटील, घनश्याम सूर्यवंशी सहित कार्यकर्त्यांचा सरपंच उमेदवार न जिंकल्याने निराशा झाली. सत्ता काँग्रेसची व सरपंच भाजपचा असे समीकरण तयार झाले. भाजपचे सुरेंद्र चौगुले, चंद्रकांत पाटील तर राष्ट्रवादीचे माजी जिल्हापरिषद सदस्य नितीन नवले, उमेश जोशी यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती.

सावंतपूर ग्रामपंचायत गतनिवडणुकीत काँग्रेसच्या गणपतराव सावंत गटाला सरपंच व १३ जागा जिंकत सत्ता काबीज केली होती. तर अपक्ष १, भाजपाला १ जागा मिळाली होती. आता काँग्रेस अंतर्गत गणपतराव सावंत व सुनील सावंत असे २ गट, राष्ट्रवादी अंतर्गत २ गट व भाजपा अशी लढत झाली. आता गणपतराव सावंत गटाला १० जागा व सुनील सावंत गटाला ५ जागा व सरपंच उमेदवार प्रल्हाद जाधव ५१६ मतांनी विजयी झाले. त्यामुळे सत्ता गणपतराव सावंत गटाची तर सरपंच सुनील गटाचा असे समीकरण तयार झाले.

ब्राम्हणाळ ग्रामपंचायत गतनिवडणुकीत काँग्रेसने सरपंच व १० जागा जिंकत सत्ता काबीज केली होती. सर्वपक्षीय आघाडीला १ जागा मिळाली होती. आता सर्वपक्षीय आघाडीला १० जागांसहित सरपंच उमेदवार गीता गायकवाड यांचा ५८३ मतांनी विजय झाला. तर काँग्रेसच्या प्रल्हाद गडदे गटाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. भाजपचे अशोक पाटील, शेतकरी संघटनेचे संदीप राजोबा, शिवाजी गडदे, सुभाष वडर, काँग्रेस गटाचे भूपाल कर्नाळे, मोहन शिनगारे, सुदर्शन मदवाना यांनी प्रतिष्ठा पणाला लावत आघाडीची सत्ता काबीज केली.

घोगाव ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाने एकहाती सत्ता अबाधित राखली. ७ जागा जिंकत सरपंच उमेदवार संदीप पाटील यांचा ३४६ मतांनी दणदणीत विजय झाला . काँग्रेसला २ जागा मिळाल्या तर राष्ट्रवादीला एकही जागा जिंकता आली नाही. काँग्रेस ,राष्ट्रवादी, भाजप अशी तिरंगी लढत झाली होती. भाजपाकडून रोहित पाटील ,संदीप पाटील ,राष्ट्रवादीकडून अक्षय जाधव तर काँग्रेसकडून विजय पाटील ,रतन पाटील यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती.

दुधोंडी ग्रामपंचायत गत निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी युतीला सरपंच व १० जागा घेत सत्ता मिळाली होती. भाजपाला ७ जागा मिळाल्या होत्या. आता भाजपा-राष्ट्रवादी वि. काँग्रेस अशी दुरंगी निवडणूक झाली. काँग्रेसने ९ जागा जिंकत व सरपंच उमेदवार उषा देशमुख यांचा ३७ मतांनी विजय झाल्या. तर भाजपाला ८ जागा मिळाल्या. दुधोंडीत प्रथमच काट्ट्याची टक्कर पाहायला मिळाली. काँग्रेसचे जे.के जाधव तर भाजपा-राष्ट्रवादी युतीचे शिवाजीराव मगर पाटील यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती.

हेही वाचा :

Back to top button