राहुरी तालुक्यात राष्ट्रवादी-भाजपमध्ये रस्सीखेच | पुढारी

राहुरी तालुक्यात राष्ट्रवादी-भाजपमध्ये रस्सीखेच

रियाज देशमुख :

राहुरी (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्यातील 11 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्ष व भाजपने सम चार ठिकाणी सत्ता मिळविण्यात यश प्राप्त केले आहे. लोकनियुक्त सरपंच पदामुळे निवडणुकीमध्ये मोठी रंगत आली होती. आरडगाव, मानोरी, सोनगाव व कोल्हार खुर्द ग्रामपंचायतीमध्ये भाजपची एकहाती सत्ता येत ‘कमळ’ फुलले तर राष्ट्रवादी प्रणित तनपुरे गटाने तुळापूर, खडांबे खुर्द, ताहाराबाद व मांजरी ग्रामपंचायतीमध्ये यश संपादित केले. कोंढवड, केंदळ खुर्द व ब्राम्हणगाव भांड येथे स्थानिक विकास आघाडीचे यश राहिले. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीची चाचपणी म्हणून पाहिल्या जाणार्‍या ग्रामपंचायत निवडणुकीला मोठे महत्व प्राप्त झाले होते.

त्यानुसार राहुरी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका या राष्ट्रवादीचे आ. प्राजक्त तनपुरे यांसह खा. डॉ. सुजय विखे व माजी आ. शिवाजीराव कर्डिले यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या समजल्या जात होत्या. दरम्यान, सोनगाव, कोल्हार खुर्द व मानोरी या गावामध्ये राष्ट्रवादीने निवडणूक न लढविता ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली. त्यानुसार सोनगाव व कोल्हार खुर्द मध्ये दोन्हीकडून विखे गटातच समोरासमोर लढत झाली. सोनगाव येथे सत्ता परिवर्तन होऊन जनसेवा मंडळ 1 यांची सत्ता आली. कोल्हार खुर्द येथे दोन्ही गट हे भाजपचे होते. तेथे दिगंबर शिरसाठ यांच्या नेतृत्वाखालील ग्रामविकास मंडळाला सरपंच पदासह 9 जागेवर निर्विवाद जागा तर विरोधी जनसेवा मंडळाला 6 जागा मिळाल्या.

तुळापूर ग्रामपंचायतीमध्ये विखे गटाच्या विकास मंडळा विरोधात राष्ट्रवादी प्रणित ग्रामविकास मंडळाला सत्ता मिळाली. राष्ट्रवादीच्या पॅनलला कर्डिले गटाच्या कार्यकर्त्यांनी समर्थन दिले होते. खडांबे खुर्द येथे पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब लटके यांनी राष्ट्रवादीची सत्ता मिळविण्यात यश मिळविले. खडांबे येथे राष्ट्रवादीने सरपंच पदासह सर्वाधिक 10 जागा जिंकत यश मिळविले. भाजपला केवळ एकच जागा मिळाली. ताहाराबाद ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी पक्षाने सत्ता पालट करीत सरपंच पदासह सर्वाधिक जागा जिंकल्या. संत महिपती महाराज यांच्या पावनभुमीमध्ये राष्ट्रवादीची सत्ता येताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. आरडगाव ग्रामपंचायतीमध्ये तनपुरे कारखान्याचे संचालक रविंद्र म्हसे यांनी राष्ट्रवादीची सत्ता उलथवून टाकली. तेथे वंचितची मोठी साथ लाभल्याने भाजपला नैदिप्यमान यश मिळाले. राष्ट्रवादीचे मते वंचितच्या वाट्याला गेल्याने तेथे भाजपची एकहाती सत्ता आल्याची चर्चा झाली.

मानोरी, सोनगाव, कोल्हार खुर्द व आरडगाव येथे निर्विवाद सत्ता मिळविणार्‍या भाजपने राहुरीत जोरदार मुसंडी मारत राष्ट्रवादीला कडवी लढत देण्यास प्रारंभ केला तर राष्ट्रवादीचे आ. प्राजक्त तनपुरे यांनी काही गावांमध्ये विखे गटाला पाठबळ तर काही गावांमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवारच उभे न केल्याने भाजपला तीन गावात सत्ता मिळविण्यात अडचण आली नाही. राष्ट्रवादी पक्षाला 4 ग्रामपंचायतींमध्ये यश मिळाले असले तरीही अपेक्षित कामगिरी करता आली नसल्याची चर्चा आहे.

ब्राम्हणगाव भांड येथे संपूर्ण गावाने एकी करीत कोणताही गट, तट व पक्ष न पाहता सविता राजेंद्र पवार यांना बिनविरोध सरपंच पदावर बसविले. तेथे 5 सदस्य बिनविरोध निवडून आले होते तर दोन जागांससाठी निवडणूक झाली. केंदळ खुर्द गावातही सदस्यपदाच्या 9 जागा बिनविरोध झाल्या होत्या. तेथे सरपंच पदासाठी गावाची सहमती न झाल्याने दोन्ही अपक्ष उमेदवारांमध्ये लढत झाली. तेथेही स्थानिक आघाडीच्या उमेदवाराने विजय मिळविला. कोंढवड गावामध्येही तरूणांनी शासकीय निवृत्त अधिकार्‍यांना पाठबळ देत गट,तट व पक्ष बाजुला ठेवत विजय मिळविला आहे. आम्ही कोणत्याही पक्षाचे नसून केवळ विकासासाठी तरूणाई एकत्र आल्याचे सांगितले.

 

Back to top button