पुढारी ऑनलाईन डेस्क : अफगाणिस्तानात तालिबान अधिकाऱ्यांनी मंगळवारी अफगाण मुलींच्या विद्यापीठीय शिक्षणावर अनिश्चित काळासाठी बंदी घालण्याचे आदेश दिले. उच्च शिक्षण मंत्रालयाने सर्व सरकारी आणि खासगी विद्यापीठांना याबाबतचे पत्र जारी केले आहे. तालिबानच्या राजवटीत महिलांच्या हक्कांवर हल्ले सुरूच आहेत.
तालिबानच्या उच्च शिक्षण मंत्री नेदा मोहम्मद नदीम यांनी स्वाक्षरी केलेल्या पत्रात म्हटले आहे की, पुढील सूचना मिळेपर्यंत महिलांचे शिक्षण स्थगित करण्याच्या नमूद आदेशाची अंमलबजावणी करावी, असे आपणा सर्वांना सूचित करण्यात येते. मंत्रालयाचे प्रवक्ते झियाउल्लाह हाशिमी, यांनी शेअर केलेल्या पत्रात या आदेशाची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
उच्च शिक्षणावर बंदी घालणारा हा आदेश देशभरातील हजारो मुली आणि महिलांना विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेला बसण्याच्या तीन महिन्यांपेक्षा कमी कालावधी असताना आला आहे. अनेक मुलींनी शिक्षण घेऊन भविष्यात इंजिनिअर आणि डॉक्टर होण्याची इच्छा व्यक्त केली होती. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये कट्टरपंथी इस्लामवाद्यांनी देश ताब्यात घेतल्यानंतर, विद्यापीठांना स्वतंत्र वर्ग आणि लिंग आधारित प्रवेशांसह नवीन नियम लागू करण्यास भाग पाडले गेले होते. तर महिलांना केवळ महिला प्राध्यापक किंवा वृद्ध पुरुषांद्वारे शिकवण्याची परवानगी दिली होती. देशभरातील बहुतेक किशोरवयीन मुलींना आधीच माध्यमिक शालेय शिक्षणापासून प्रतिबंधित केले आहे, तालिबानच्या म्हणण्यानुसार पुरूष आणि महिला विद्यार्थी शाळेत एकत्र शिकू शकत नाहीत कारण यामुळे अभ्यासात व्यत्यय येतो.
हेही वाचा :