महाविकास आघाडीचा मोर्चा सरकारला धडकी भरवणारा असेल : जयंत पाटील

महाविकास आघाडीचा मोर्चा सरकारला धडकी भरवणारा असेल : जयंत पाटील
Published on
Updated on

सांगली; पुढारी वृत्तसेवा : राज्यपाल व भाजपचे लोक महापुरुषांबाबत अनुउद्गार काढत आहेत. राज्यातील मंत्री महापुरुषांच्या कार्याचा अपमान करत आहेत. आज महाराष्ट्रात प्रचंड बेरोजगारी आहे. यावर तोडगा न काढता बेरोजगारीवर अधिक भर घालण्याचे काम राज्यातील शिंदे टोळी आणि भाजपचे सरकार करत आहे. त्यामुळेच उद्याचा महाविकास आघाडीचा महामोर्चा हा सरकारला धडकी भरवणारा असेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला. प्रसार माध्यमांनी घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

ते म्हणाले, महापुरुषांबद्दलच्या वक्तव्यांमागे शंभर टक्के एक अजेंडा आहे. एखादा बुरुज जर पाडायचा असेल तर त्या बुरुजाचा एका-एका दगडावर हल्ला केला जातो. छत्रपती शिवाजी महाराज ही आपली अस्मिता आहे. आपल्या स्वाभिमानावर हल्ला करून हा बुरुज पाडण्याचा प्रकार सुरू आहे. ही वक्तव्य चुकून केली जात नाही, अज्ञानाने झालेले नाही, जाणीवपूर्वक केली जात आहेत. जुना इतिहास पुसून काढायचा, महाराष्ट्राचा वेगळा इतिहास रचायचा हे कारस्थान आहे. नवा इतिहास आपल्यापासून सुरू झाला पाहिजे, असे काही लोकांना वाटते. त्यासाठीच खरा इतिहास पुसून नवा इतिहास मांडण्याचे कारस्थान सुरू आहे, असा आरोप पाटील यांनी केला.

महापुरुषांची अस्मिता कशी भंग होईल यासाठी प्रयत्न होत आहेत. भाजपचे लोक त्यात अग्रणी आहेत. लोकांच्या मनात तीव्र राग आहे. लोक भाजपच्या लोकांना रस्त्यावर फिरणे मुश्कील करतील. राज्यपालांना भाजपने तात्काळ हटवायला पाहिजे होते. राज्यपाल महाराष्ट्राच्या विरोधात वागतात तरीही त्यांच्या एकाही कृतीवर केंद्रसरकारने भूमिका घेतली नाही. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातही महाराष्ट्रद्रोही लोक आहेत. गुजरातमध्ये निवडणुका होत्या म्हणून वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअरबससारखे प्रकल्प गुजरातला गेले. महाराष्ट्रातील तरुणांची संधी हिसकावून घेतली गेली. यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काहीच बोलत नाहीत. उलट तिकडे आलेल्या नवीन सरकाराच्या शपथविधीला उपस्थित राहतात हे दुर्दैवी आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री आपल्या राज्याबद्दल काहीही बोलतात त्याबाबतही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काही बोलत नाहीत. त्यांनी स्वाभिमान गहाण ठेवला आहे, अशी टीका पाटील यांनी केली.

महाविकास आघाडी सरकार असताना म्हैसाळ योजनेमार्फत जत तालुक्यातील ६५ गावांना पाणी देण्याची संपूर्ण व्यवस्था केली होती. या भागांना ६ टीएमसी अतिरिक्त पाणी मिळणार आहे. त्याचे डिझाइन पूर्णतः तयार आहे. हा विषय फक्त मंत्रिमंडळासमोर येऊन त्याला मंत्रिमंडळाच्या मान्यतेची गरज आहे. मात्र हे सरकार फक्त आमदार सांभाळण्यात व्यस्त आहे. सीमा भागातील अनेक गावे या सरकारच्या नाकर्तेपणामुळे इतर राज्यात जाण्याची मागणी करत आहेत हे दुदैवी आहे, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केंद्राला शरण गेले आहेत का?

कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणतात ते माझे ट्विट नव्हे. हा खोटेपणा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निमूटपणे सहन करत आहेत. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या दारात गेल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणतात ते ट्विट त्यांचे नाही. ट्विट त्यांचे नसेल तर मग ते अद्याप डिलीट कसे झाले नाही? ज्या दिवशी ट्विट आले त्यादिवशी त्यांनी स्पष्टीकरण द्यायला हवे होते. हा जाब आमच्या मुख्यमंत्र्यांनी विचारला नाही. मुख्यमंत्री त्यांना शरण गेले आहेत का? असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला. मविआच्या एकजुटीचे उत्तर शिंदे टोळी आणि भाजपला महामोर्चात मिळेल. महामोर्चाची गर्दी पाहून नक्कीच राज्यकर्त्यांच्या छातीत धडकी भरेल.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news