

जालना; पुढारी वृत्तसेवा : मुलगी काहीही न सांगता एका युवकासोबत घरातून निघून गेल्याने समाजात अपमान झाल्याचा राग मनात धरून पित्याने मुलीला फाशी देऊन तिचा परस्पर अंत्यविधी केल्याची धक्कादायक घटना जालना तालुक्यातील पिरपिंपळगाव येथे घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मुलीचे वडील संतोष भाऊराव सरोदे व चुलते नामदेव या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Jalna Honour killing)
शहरातील राजूर रोडवर असलेल्या शिवारात मुलीचा परस्पर अंत्यविधी झाल्याची माहिती पोलिसांना बुधवारी मिळाली. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी पिरपिंपळगावचे पोलिसपाटील बावणे यांच्याशी संपर्क साधला. संशयित संतोष यांच्या शेतातील वस्तीवर जात त्यांनी पोलिसी खाक्याने विचारणा केली असता दोघा भावांनी खुनाची कबुली दिली.
सुरेखा संतोष सरोदे (17) ही अकरावीत शिकणारी मुलगी दोन-तीन दिवसांपूर्वी घरातून निघून गेली होती. मंगळवारी (दि. 13) दुपारी घरी आल्यानंतर तिच्याकडे विचारपूस केली असता वाद झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या वडिलांनी बुधवारी दुपारी चारच्या दरम्यान चुलत्याच्या मदतीने तिला कडुनिंबाच्या झाडाला दोरीने लटकवत देत जीवे मारले. त्यानंतर संध्याकाळी तिचा मृतदेह जाळून टाकण्यात आाला.
पोलिसांनी परिसराची पाहणी केली असता पोल्ट्री फार्मलगत अंत्यविधी केल्याचे तसेच राख पोत्यात भरून ठेवल्याचे आढळून आले. त्यावरून संतोष व नामदेव सरोदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Jalna Honour killing)