सांगली : म्हैसाळ योजनेच्या जतमधील मायथळ कालव्याची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी | पुढारी

सांगली : म्हैसाळ योजनेच्या जतमधील मायथळ कालव्याची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

जत; पुढारी वृत्तसेवा : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जतच्या ४० गावावर दावा केल्यानंतर जतेत मोठा कल्लोळ माजला होता. त्यातच बुधवारी (दि.१) रात्री उशिरा जतच्या शिष्टमंडळाने मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या शिष्टमंडळाने विस्तारीत योजना सुरू होईपर्यंत मायथळ कालव्यातून पाणी सोडण्याची विनंती केली होती. यावर मुख्यमंत्र्यांनी तातडीने जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांना गुरूवारी जतच्या दौऱ्यावर पाठवले.

गुरूवारी सकाळी साडे वाजल्यापासून जिल्हाधिकारी व पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांनी दिवसभर पाहणी केली. म्हैसाळ योजनेतून मंगळवेढा व उमदीकडे जाणाऱ्या म्हैसाळ टप्पा क्रमांक सहा मधून मायथळ गावाच्या पूर्वेस व माडग्याळ गावाच्या उशाला असणाऱ्या कॅनालमधून माडग्याळ पासून व्हसपेठ तलाव व तेथून पुढे गुड्डापूर तलावात पाणी कशा पद्धतीने घेवून जाता येईल व या पाण्यातून किती गावांसाठी पाणी पुरवठा करणे शक्य आहे, याची माहिती जिल्हाधिकारी यांनी म्हैसाळ उपसासिंचन योजनेच्या अधिकाऱ्याकडून जाणून घेतली. त्यासाठी येणारा खर्च जवळपास वीस कोटी रुपये येणार असल्याची माहिती उपअभियंता गणेश खारमटे म्हैसाळ योजना यांनी दिली.

दरम्यान, यावेळी शिवसेना शिंदे गटाचे तालुका अध्यक्ष अंकुश हुवाळे व माजी पंचायत समिती सदस्य सोमाण्णा हाक्के यांनी जिल्हाधिकारी यांना मायथळ कॅनाल माडग्याळ जवळ फोडून तो कॅनाल माडग्याळ पासून तीन किलोमीटर व्हसपेठ व तेथून पुढे तीन किलोमीटर गुडडापूर तलावात पाणी सोडल्यास माडग्याळसह आठ गावे पुर्णपणे व व्हसपेठ तलावात पाणी सोडल्यास ते पाणी नैसर्गिक नाल्याद्वारे उमदी पर्यंत पाणी जावू शकते व गुड्डापूर तलावात पाणी सोडल्यास ते पाणी संख मध्यम प्रकल्पामध्ये जावून जत तालुक्यातील पुर्व भागातील जवळपास चाळीस गावांना यांचा फायदा होईल व भविष्यात पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय होणार आहे. त्यामुळे म्हैसाळ विस्तारीत योजना मार्गी लागण्या आगोदर आम्हाला या पध्दतीने पाणी मिळावे, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली.

जिल्हाधिकारी यांनी उपस्थित लोकप्रतिनिधींशी चर्चा करून शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. ग्रामपंचायतीच्या निवडणुकिची आचारसंहिता असल्याने मी स्पष्टपणे काही सांगू शकत नाही, मात्र जनतेच्या भावना मी राज्य सरकाराला कळवू तसेच विस्तारित म्हैसाळ योजना सध्या अंतिम टप्प्यात आहे, ती शक्य तितक्या लवकर मार्गी लावण्यासाठी प्रशासन काम करत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

यावेळी दौऱ्यात प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे, संखचे अपर तहसीलदार सुधाकर मागाडे, म्हैसाळ योजनेचे उपअभियंता गणेश खारमटे, उपअभियंता बाळासाहेब पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख अंकुश हुवाळे, माजी पंचायत समिती सदस्य सोमाण्णा हाक्के, गुड्डापूरचे सरपंच प्रसाद पुजारी, जतचे पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे, उमदीचे पोलीस निरीक्षक पंकज पवार, सूनील घाटगे, संभाजी सावंत, आबण्णा माळी, केराप्पा हुवाळे आदी उपस्थित होते.

अधिक वाचा :

Back to top button